आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने कार्ला ग्रामपंचायत कार्यालयाचे मोठे नुकसान,सुदैवाने जीवितहानी टळली..

0
233

कार्ला – मावळ प्रतिनिधी- दि. .20 : कार्ला परिसरात पडत असलेल्या मुसळधार पाऊस व वा-यामुळे कार्ला ग्रामपंचायतीस लागून असलेले आंब्याचे एक जुने झाड ग्रामपंचायत व बॕंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या आवारात पहाटेच्या सुमारास कोसळले असून त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे हे झाड कोसळल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

कार्यालयीन कामकाज सुरु असते वेळी हे झाड पडले असते तर मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.आंब्याचे झाड पडल्याने ग्रामपंचायत इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या शेडचे पत्रे फुटले तर खिडक्यांचे देखील नुकसान झाले तसेच कार्ला बॕंक आॕफ महाराष्ट्र शाखेच्या समोर असलेले शेडचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

दररोज अनेक नागरिक बँकेत पैसे काढणे व भरण्यासाठी रांग लावून याच आवारात उभे असतात तसेच बँक, दुरसंचार विभागाचे कार्यालयाबरोबर कार्ला ग्रामपंचायत कार्यालय ह्या एकाच आवारात असल्याने दिवसा इथे नागरिकांची खूप वर्दळ असते. सुदैवाने हे झाड पहाटेच्या वेळी जमीनदोस्त झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून त्याचबरोबर कार्ला गावातील हसनभाई शेख यांच्या घराची भिंत देखील पहाटे मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने पडली आहे.