
बॅ .अंतुले साहेब व स्वर्गीय तुकाराम सुर्वे यांच्या काँग्रेस पक्षाला मतभेद विसरून मजबूत बनवा…
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
आजपर्यंत काँग्रेस पक्षाचे इतर पक्षांनी फक्त लचके तोडण्याचे काम केले आहे,मात्र अजूनही रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत असून रायगडातील या बॅरिस्टर अंतुले साहेबांनी वाढविलेल्या पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त करण्यासाठी आपआपसातील मतभेद बाजूला करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करून एक नंबरचा पक्ष होण्यासाठी कामाला लागा,असा कानमंत्र रायगडचे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष मा. महेंद्रशेठ घरत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.ते कर्जत तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित केलेल्या नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष मा.महेंद्रशेठ घरत यांचा जाहीर सत्कार व कार्यकर्त्यांचा मेळावा कर्जत शनी मंदिर हॉल मध्ये आज दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केला होता,त्यावेळी ते बोलत होते.यावेळी शनी मंदिर सभागृह कार्यकर्ते व महिलांनी भरलेला होता.
या मेळाव्याचे प्रथम दिप प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, जिल्हा महिला अध्यक्षा ऍड.श्रध्दा ठाकूर, प्रदेश चिटणीस नंदा म्हात्रे , राजिप सदस्या अनुसया पादिर , चंद्रकांत मांडे , कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड , कर्जत तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे , महिला तालुका अध्यक्षा दिपाली पाटील , बुबेरे , माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर , कर्जत शहर अध्यक्ष इरफान अत्तार , यांसहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते.व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा जंबो पुष्पहार घालून तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे व शहर अध्यक्ष इरफान अत्तार यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, हा कर्जत तालुका बॅरिस्टर अंतुले साहेब व स्वर्गीय माजी आमदार तुकाराम अण्णा सुर्वे यांना मानणारे येथील कार्यकर्ते आहेत.येथील जिल्हा परिषद सदस्य अनुसयाताई पादिर आमच्या सीनियर मेंबर आहेत.कर्जत तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेले ,त्यांची अवस्था काय आहे,त्याचे आत्मपरीक्षण करणे , यावर प्रकाश टाकत आजही काँग्रेसची दोन अडीच लाख मते या रायगड जिल्ह्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसला विचारल्याशिवाय कुठल्याच पक्षाला सत्तेत स्थान मिळत नाही , हे ठोकून सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बोलतात एक आणि करतात एक ,असा घणाघाती आरोप देखील त्यांनी याठिकाणी केला.इतर पक्षात गेलेले नेते हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते,त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन काँग्रेसचे लचके तोडून आपला पक्ष वाढवला.आता जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येणार असल्याने कार्यकर्त्यांनी सावध रहाण्याचा ईशारा देखील सर्वांना दिला. माझे दोन मोबाईल व घर – ऑफिस नेहमी कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र उघडे असेल , कधीही समस्या घेऊन या , असा संदेश देऊन महागाई , बेरोजगारी , पेट्रोल – डिझेल यांचे वाढते दर,शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी , महिलांच्या रक्षणासाठी काँग्रेसला मजबूत करून पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होईल,असे काम करा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
तर काँग्रेसची ताकद वाढवा ,प्रदेश अध्यक्ष नाना पटोले चक्री लावल्या सारखे फिरत आहेत,जे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मदत करतील, त्यांच्या समस्या सोडवतील, बूथ वाईज कार्य करतील तेच पदाधिकारी पदावर रहातील,असा सज्जड ईशारा देखील त्यांनी पदाधिकारी यांना दिला. गवताच्या पातीला भाला बनविण्याची ताकद निर्माण करा,असा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्याच्या निमित्ताने निर्माण केला.
यावेळी श्रध्दा ठाकूर महिला जिल्हा अध्यक्षा म्हणाल्या की,हा मेळाव्या निमित्त नवचैत्यन्य निर्माण झाले असून काँग्रेसचा बालेकील्ला बनवून सर्वांनी जोमाने कामाला लागा,येथे नक्कीच तिरंगा फडकेल.
स्वर्गीय इंदिरा गांधी या माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे यांच्या प्रचाराला कर्जतमध्ये आल्या होत्या,हे जाणून काँग्रेस पक्षाचे महत्व किती आहे,असा संदेश त्यांनी दिला.तर कर्जत तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी काँग्रेस फक्त कर्जत तालुक्यात ११ जणांचा पक्ष आहे,यावर त्यांनी सडेतोड उत्तर देत म्हणाले की, बघा हा हॉल खचाखच भरलेला आहे,तो बघायला या,असा टोला त्यांनी विरोधकांना दिला, कर्जत तालुक्यात जुने जाणते पदाधिकारी, कार्यकर्ते असताना काँग्रेस येथे जोरदार आहे,कोरोना काळात, वादळी वारा या परिस्थितीत काँग्रेसने येथे काम केले आहे.
कर्जत तालुक्यात १८४ बूथ कमिटी असताना बूथ पासून कामे करावी लागणार आहे , माझे वडील स्वर्गीय माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या वेळी काँग्रेस पक्ष होता तसा काँग्रेस पक्ष करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची माझी तयारी आहे , कुणालाही पद द्या,मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे,असे सांगितले.नंदा म्हात्रे – महाराष्ट्र प्रदेश चिटणीस,माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,पत्रकार विजय मांडे यांनीही आपले मत मांडून मार्गदर्शन केले.
यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे कर्जत न.प.चे अंत्यविधी करणारे कर्मचारी,वांगणी येथे रेल्वे फलाटावर चिमुकल्याचा जीव वाचविणारा शूरवीर मयूर शेळके,उत्कर्ष प्रोडक्शनच्या माध्यमातून ” वळण ” हा चित्रपट काढणारे अभिनेता – दिग्दर्शक – मार्गदर्शक प्रदिप गोगटे , जेष्ठ पत्रकार विजय मांडे , तर काँग्रेसचे ७५ वर्षावरील जेष्ठ शिलेदार जलील मिरझा , दामोदर शहासने , चांदभाई मुजावर , दीनानाथ देशमुख , भालचंद्र घुमरे , भाऊ केवारी , गोमा भुजडा , खांडस ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी निवड झाल्याने सौ.मनीषा माळी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला , शेवटी माजी कर्जत नगराध्यक्ष धनंजय चाचड यांनी आभार प्रदर्शन केले.