Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआदिवासींना प्रतीक्षा पनवेल (धोदाणी)मार्गे माथेरान रस्त्याची..

आदिवासींना प्रतीक्षा पनवेल (धोदाणी)मार्गे माथेरान रस्त्याची..

माथेरान (दत्ता शिंदे)पूर्वीपासूनच डोंगर दर्यातील चढउतार पादाक्रांत करून जीवनाचा शेवट व्हायला आला तरीसुद्धा माथेरान या सुंदर रमणीय ठिकाणी साध्या पर्यायी मार्गाची व्यवस्था होऊ शकत नाही ही खरोखरच एकप्रकारे या गावाची शोकांतिका म्हणावी लागेल असे सूर आता आदिवासींच्या मुखातून सुद्धा निघताना ऐकावयास मिळतात.


माथेरानच्या पायथ्याशी असंख्य आदिवासी वाड्या असून हे लोक लहानपणापासून माथेरानला काहिनाकाही भाजीपाला, घोड्यांचे गवत,पावसाळ्यात मासे अर्थातच ऋतू प्रमाणे वस्तू घेऊन अवघड डोंगर रांगेतून माथेरानला नियमितपणे येत असतात. तर कुणी कामानिमित्त दररोज जवळपास सात ते आठ किलोमीटरची पायपीट करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी येणे हा त्यांचा नित्यनेम आहे.जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना सुद्धा इथला डोंगर दर्यातील आदिवासी वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हापावसात संघर्षमय जीवन जगत आहेत.


पनवेल (धोदाणी)मार्गे माथेरान रस्त्याची प्रतीक्षा माथेरानकर मागील चार दशकांपासून करीत आहेत परंतु शासनाने त्याचप्रमाणे काही स्वार्थी राजकारणी लोकांनी आजमितीपर्यंत या सुंदर पर्यटनस्थळाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे आजही जेष्ठ मंडळींकडून बोलले जात आहे.माथेरान मधील सनसेट पॉईंट येथूनच धोदाणी तसेच आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी वाड्याकडे जाणारी पायवाट आहे. हीच दोन ते तीन किलोमीटर पायवाट उत्तम प्रकारे बनविल्यास पुढे कुठेही अवघड घाट अथवा डोंगराचा भाग नाही.

सनसेट पॉईंट वरून ह्या मार्गाची निर्मिती केल्यास माथेरान आणि पनवेल हे अंतर हाकेच्या अंतरावर येणार आहे. सध्यातरी माथेरान करांना कर्जत अथवा अन्य ठिकाणी विविध कामांसाठी जावे लागते.तर दरवर्षी माथेरान मधून आठ ते दहा स्थानिक कुटुंबे ही केवळ मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी नेरळ, कर्जत,बदलापूर अथवा अन्य ठिकाणी स्थायिक होताना दिसत आहेेत.शासनाने पनवेल (धोदाणी)मार्गे माथेरान रस्त्याची कवाडे खुली केल्याशिवाय इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकत नाहीत.

माथेरान मध्ये केवळ लॉजिंग आणि घोडा हाच व्यवसाय आहे यापलीकडे अन्य काही व्यवसायाचे साधन नसल्याने अनेकांना सुशिक्षित बेरोजगारांना नाईलाजाने ही कामे करावी लागत आहेत.पनवेल हा इंडस्ट्री भाग असल्याने इथल्या भूमिपुत्रांना सहाजिकच या ठिकाणी नोकरीच्या, कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा ही एक सुवर्णसंधी निर्माण होऊ शकते.त्यामुळे इथला पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेला स्थानिक भूमिपुत्र विखुरला जाणार नाही.निदान माथेरानचे पर्यटन वाढीसाठी आणि येथील भावी पिढीच्या उत्कर्षासाठी तरी शासनाने या मार्गाचा विचार करावा असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page