भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कर्जत व एमजीएम वैद्यकीय व दंत महाविद्यालय कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व दंत रोग चिकित्सा व उपचार या महाआरोग्य शिबिराचा महामेळावा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जत येथे दि. ६ ते ८ जानेवारी २०२२ या तारखेपर्यंत आयोजन केले असून या महाशिबिराचे उदघाटन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
तर अनेक दिवसांपासून कर्जतकर नागरिकांची मुख्य समस्या असलेले ब्लड स्टोअरेज केंद्र पुन्हा एकदा सुरू झाले असून त्याचप्रमाणे कोरोना – ओमीक्रोनच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची वाढती संख्या बघता आरोग्य यंत्रणा सज्ज असावी म्हणून सुसज्ज ऑक्सिजन बेडचे देखील आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी या महाआरोग्य शिबिरात नेत्र चिकित्सा तपासणी ,त्वचा रोग ,दंत चिकित्सा ,स्त्री रोग तपासणी , इसीजी तपासणी ,बाल रोग तपासणी ,अस्थिरोग तपासणी , कान ,नाक , घसा तपासणी , शालेय आरोग्य तपासणी आदी आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहेत.
तळ मजला ,पहिला मजला ,दुसरा मजल्यावर विभागवार कक्ष निर्मिती केली असून तळ मजल्यावर नोंदणी आणि औषध वाटप विभाग आहे.शिबिराची वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे . या शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे यांनी केले आहे.यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या सुसज्ज ऑक्सिजन वॉर्ड ची पाहणी करत डॉ.मनोज बनसोडे यांच्याकडून सद्य स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी डॉ. बनसोडे यांनी एकही रुग्ण दाखल झाला नसल्याचे सांगत नागरिकांनी दोन डोस घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जाणवत असल्याचे नमूद केले .तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोनावर मात करावी , असे आवाहन त्यांनी केले.आमदार थोरवे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला ज्या साधन सामुग्रीची आवश्यकता भासेल ते उपलब्ध करून दिले जाईल जेणे करून येणाऱ्या रुग्ण तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासन दिले.
आरोग्य सेवा ठाणे मंडळाच्या उप संचालक डॉ.गौरी राठोड यांनी याला अनुमती दर्शविली.याप्रसंगी कर्जत प्रांत अधिकारी अजित नैराळे , तहसीलदार विक्रम देशमुख , कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक संकेत भासे , लॅब तज्ञ रवींद्र माने ,अप्पा बैलमारे , सुनील गोगटे त्याचप्रमाणे हॉस्पिटलचे स्टाफ , नागरिक आदी उपस्थित होते.