Saturday, November 2, 2024
Homeपुणेलोणावळाआयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन...

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन…

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन.वयाच्या 81 व्या वर्षी दिपज्योत मालवली. आत्मसंतुलनाचा दिपस्तंभ निमाला आत्मसंतुलनामार्फत अनेक वर्ष व्यवसाय नाही लोकसेवा समजून लोकांच्या आरोग्यासाठी व आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी अग्रेसर असणारे डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चच्यात पत्नी विना, मुलगा सुनील, संजय, ष्णूषा व नातवंड असा परिवार आहे. डॉ. बालाजी तांबे यांनी आयुर्वेद व योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतले होते. एकाएकी मागील आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचे निधन झाले आहे.

डॉ. तांबे यांनी सकाळच्या ” फॅमिली डॉक्टर ” या पुरवणी मधून आरोग्यविषयक जागृती केली तसेच त्यातून शेकडो विषयांवर वेगवेगळे लेख लिहिले त्याचबरोबर नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. आयुर्वेद, अध्यात्म आणि संगितोपचार यांचा पाच दशके प्रसार केला. त्यांनी शास्त्रशुद्ध व गुणवत्तापूर्वक औषधांवर संशोधन करून त्यांची निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

तसेच आयुर्वेद हे केवळ भारतापर्यंत मर्यादित न ठेवता त्याचा परदेशातही प्रसार केला व परदेशातील नागरिकांना त्याचे महत्व आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले. कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली.

त्यानिमित्ताने राजकीय, अभिनेते, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर कार्ला येथील आत्मसंतुलन आश्रमास भेटी देत असत त्याचबरोबर परदेशातील नागरिक सुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी कार्ला येथे असत. डॉ. तांबे यांनी साम वाहिनीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम करून आयुर्वेदाचे महत्व त्यांनी लोकांपर्यंत पोहचविले. नवीन पिढीसाठी त्यांनी “गर्भ संस्कार” या पुस्तकाचे इंग्रजी सह इतर सहा भाषांमधून प्रकाशन केले आहे. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page