इन्स्टावर ” 302 शंभर टक्के ” स्टेटस ठेवल्याने 17 वर्षीय दशांतला गमवावा लागला जीव..

0
974

तळेगाव : बुधवारी रात्री तळेगाव दाभाडे येथील 17 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्याला इन्स्टग्रामवर स्टेटस ठेवणे किती महागात पडू शकते , याचे ज्वलंत उदाहरण तळेगाव दाभाडे येथे पाहायला मिळाले आहे. दशांत परदेशी या 17 वर्षीय मुलाने ‘302 शंभर टक्के’ असं लिहिलेलं आणि त्यासोबत पिस्तूलाचा इमोजी अशा आशयाच स्टेटस ठेऊन ते केवळ सख्खा चुलत भाऊ आणि त्याच्या मित्रालाच दिसेल अशी सेटिंग केली होती, असं सांगण्यात आले आहे. त्यावरून तो आपल्याला मारून टाकले या भीतीने स्टेटस ठेवणाऱ्या 17 वर्षीय चुलत भावाची दोघांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना तळेगावमध्ये घडली असून दशांत परदेशी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश लोहार आणि दशांतचा चुलत भाऊ कमलेश परदेशी या दोघांना तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दशांतने चुलत भाऊ कमलेश आणि मित्र प्रकाशला काही महिन्यांपूर्वी बांबूने मारहाण केली होती. त्यांनतर, हे प्रकरण मिटले असे वाटत असताना दशांतने 302 शंभर टक्के अन पिस्तूलाची इमोजी असे इन्स्टावर स्टेटस ठेवले होते. विशेष म्हणजे ते प्रकाश आणि कमलेशलाच दिसेल अशी सेटिंग केली होती. त्यामुळे दशांत आपल्याला जीवानिशी मारणार असल्याची भीती या दोघांच्या मनात होती. त्यामुळे बुधवारी दशांतचा चुलत भाऊ कमलेश हा फोन करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना दशांतला अज्ञात स्थळी बोलावून मारायचे होते. पण, तो कमलेशला जास्त काही न बोलता फोन ठेवून द्यायचा.

अखेर, कमलेशने प्रकाशला फोन करण्यास सांगितले. त्यानंतर दशांतने प्रकाशचा फोन उचलला असता, तू फोटो छान काढतोस माझे फोटो काढायचे आहेत असे म्हणून दंशातला हेवी नॅशनल कंपनी परिसरात बोलावले गेले. तिथे दशांत येण्यापूर्वी त्याचा खून कसा करायचा याचे त्यांनी नियोजन केले. दशांत आल्यानंतर चुलत भाऊ कमलेशचा फोटो काढण्यास त्याला सांगितले गेले यानंतर दशांतने खाली बसून फोटो काढण्याची पोज घेतली, दरम्यान, तेव्हाच त्याच्या पाठीमागून प्रकाश लोहारने त्याच्या डोक्यात हातोडीने घाव घातला. यामुळे दशांत जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतरही कमलेशने दशांतवर पुन्हा हातोडीचे घाव घातले आणि त्याची हत्या केली.

दुसरीकडे दशांतचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. त्यांना त्याचा मृतदेह हा हेवी नॅशनल कंपनी परिसरात आढळला व त्यानंतर एकच खळबळ उडाली. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन तपासाची चक्रे फिरवली. शोध सुरू झाला, तेव्हाच ज्या – ज्या ठिकाणी पोलीस जात होते तिथे आरोपी प्रकाश लोहार हा उपस्थित असायचा. याचा संशय पोलिसांना आला, पोलिसांनी केवळ संशयाच्या धाग्यावर त्याच्या खांद्यावर हाथ टाकला आणि तो घाबरला. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले तिथे बराच वेळ प्रकाशने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, अखेर त्याने दशांतचा चुलत भाऊ कमलेशसह खून केल्याचं सांगितले . तातडीने कमलेशला देखील अटक करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली आहे.