Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडउद्या पासून कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे साईडचा ब्रिज दुरुस्तीसाठी एक महिना बंद...

उद्या पासून कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे साईडचा ब्रिज दुरुस्तीसाठी एक महिना बंद !

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे कडील बाजूच्या ब्रिजचे दुरुस्तीचे काम २० डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार असल्याने तब्बल एक महिना हा ब्रिज रेल्वे प्रवासी व पश्चिम भागाकडे रहाणाऱ्या भिसेगाव , गुंडगे , स्टँड परिसर , व इतर नागरिकांना ये – जा करण्यास बंद असणार आहे.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असून , हा आदेश रेल्वे बोर्डाचा असल्याने आमच्या हातात यांत फेरबदल करण्याचा काहीच अधिकार नसल्याचे कर्जत स्टेशन मास्तर यांनी सांगितले आहे.गुजरात येथे ब्रिज तुटल्याची घटना घडली असल्याने महाराष्ट्रातील देखील रेल्वे ब्रिज सक्षम आहेत की नाही , याचे परिक्षण व दुरुस्ती करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिलेले आहेत , हे काम ठेकेदारी पद्धतीने दिले असून तब्बल एक महिना हे काम चालणार आहे . कर्जत रेल्वे स्थानकातील १ नंबर प्लॅटफॉर्मवर जाण्या येण्यास मुभा आहे.
प्लॅटफॉर्म नंबर २ व ३ तसेच ईएमव्ही प्लेटफॉर्म वर जायचे असेल तर मुंबई कडील ब्रिजचा वापर करून त्या – त्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्रवाश्यांना जावे लागेल , तर भिसेगाव , गुंडगे व पश्चिम भागातील नागरिकांना नवीन बांधलेल्या पादचारी पुलावरून दोन व तीन नंबर प्लॅटफॉर्म चा वापर करून मुंबई साईडच्या ब्रिजवरून बाजारात जावे लागणार आहे. सदरचा पल्ला हा लांब असल्याने नागरिकांना याचा त्रास होणार आहे , मात्र भविष्यात रेल्वे प्रवासी व नागरिकांना अश्या कमकुवत ब्रिज पडून जीवाला त्रास नको , म्हणूनच हि खबरदारी घेण्यात येणार आहे.

कर्जत रेल्वे तिकीट घराजवळील हा ब्रिज २०१० साली बनविण्यात आला आहे , हा ब्रिज कमकुवत झाला की कसे , ब्रिजच्या खालून तपासणी करण्यात येणार आहे ,त्यातच भविष्यात ब्रिजच्या कामासाठी रेल्वे गाड्या देखील बंद घ्याव्या लागतील , असे रेल्वे प्रशासनाने म्हणणे आहे . मात्र येथील रहिवासी वर्गाला बाजारहाट , शाळा , दवाखाना , शासकीय , बँकेची कामे करण्यास नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे . त्यातच जर रेल्वे प्लॅटफॉर्म चा वापर नागरिकांनी केला , तर विना तिकीट त्यांना पकडले देखील जाऊ शकते , सदरचे काम हे १ महिन्याचे आहे का ? अश्या विविध चर्चेने नागरिकांत व महिला वर्गांत संताप खदखदत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page