Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडउल्हास नदीत सांडपाणी-मल-मूत्र सोडणाऱ्या रहिवाश्यांवर कारवाई करा,उल्हास नदी निर्मल जल अभियान संघटनेची...

उल्हास नदीत सांडपाणी-मल-मूत्र सोडणाऱ्या रहिवाश्यांवर कारवाई करा,उल्हास नदी निर्मल जल अभियान संघटनेची मागणी..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कर्जत शहरातील उल्हास नदी प्रदूषण नियंत्रण ठेवणे या विषयामुळे नेहमीच चर्चेत आली आहे.यावेळी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उल्हास नदी प्रदूषण रोखण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र त्या उल्हास नदीत बेकायदेशीर बांधकाम करून रहात असलेल्या नागरिकांचे सांडपाणी – मल – मूत्र – खरकटे – कचरा व ईतर काहीबाही नदीच्या पात्रात टाकून नदी गटारगंगा झाली असल्याचे पालिका प्रशासनास उल्हास नदी निर्मल जल अभियान या संघटनेने तक्रार निवेदन देऊन जागृत केले आहे , मात्र या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की राजकीय हस्तक्षेप होत आहे ,याचे कोडे कर्जतकरांना अद्यापी उलगडलेले नाही.


उल्हास नदी परिसरातील शनिमंदिर ते उगले हाईट्स समोरील राकेश मसाले यांचे घर ह्या पट्ट्यातील राहणाऱ्या नागरिकांची घरे नदीच्या पात्रात बेकायदेशीर बांधलेली आहेत . त्यांचे सांडपाणी प्रत्यक्ष नदीत सोडत आहेत.त्यातच घरात बांधलेल्या संडास-बाथरूमचे मल-मूत्र,तर घरातील कचरा,खिडकीतून नदीत भिरकावला जातो,हे प्रत्यक्ष निर्मल जल अभियान संघटनेच्या सभासदांनी बघितले असता हरकत घेऊनही पालिका प्रशासन यावर कुठलीच कारवाई करत नाहीत.तर शहरातील विविध भागातून वाहत आलेले दूषित सांडपाणी हे सुद्धा नदीतच सोडले जाते,मात्र पालिकेचे यावर नियोजन शून्य काम आहे.

उल्हास नदी निर्मल जल अभियान अंतर्गत संघटनेने नदी प्रदूषण मुक्त कशी करता येईल व नदीचा परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून विविध उपक्रम राबवित आहेत.यावर पालिका प्रशासन व प्रत्येकवेळी नव्याने आलेले मुख्याधिकारी तसेच सत्ताधारी या गंभीर बाबींकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल,नदीकाठी चौपाटी बांधण्यात येईल,असे कामचलाऊ उत्तरे देतात,असा आरोपही निर्मल जल अभियानाने केला आहे.

तरी नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कर्जत शहरातील उल्हास नदीच्या पात्रात बेकायदेशीर बांधकामाबरोबरच कचरा , सांडपाणी- मल – मूत्र , सोडण्याच्या प्रकाराचे प्रथम लवकरात – लवकर नियोजन करावे , आणि त्यानंतरच सुशोभीकरण अथवा ईतर तत्सम कामांचा विचार करावा.नदीकिनारी दररोज कचरा टाकण्यात येणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी,नदी सुशोभीकरण करत असताना काँक्रीट अथवा पर्यावरणास अपाय होईल अशा गोष्टींचा वापर टाळावा,नदी सुशोभीकरण करताना प्रत्यक्ष नदी पात्रात बांधकाम होणार नाही , याची खबरदारी घ्यावी,अशी मागणी करून उल्हास नदीचे पावित्र्य जतन करणे,पाणी शुद्ध ठेवणे, तिच्या नैसर्गिक स्वरूपास कुठेही बाधा न पोहोचावी याची खबरदारी व जबाबदारी सर्व कर्जतकरांची आहे.

असा संदेश देखील यानिमित्ताने उल्हास नदी निर्मल जल अभियान या संघटनेने जिल्हाधिकारी , कर्जत नगर परिषद प्रशासन व पालिकेतील सत्ताधारी व सर्व लोकप्रतिनिधींना तक्रार निवेदन देऊन केला आहे . त्यामुळे मा . जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन ही गंभीर बाब बघावी व उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यास निर्णय घ्यावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे . आत्ता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात , की यापूर्वीच्या जिल्हाधिकारी प्रमाणे बघ्याची भूमिका घेतात , याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .यावेळी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ . पंकज पाटील यांना निवेदन देताना समीर सोहोनी , मुकुंद भागवत , समीर विध्वंस , सदानंद जोशी ,विशाल सुर्वे आदी उल्हास नदी निर्मल जल अभियान संघटनेचे सभासद उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page