Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतकरांची सुरक्षा बेभरवशाची , कोरोना काळात सरकारी यंत्रणा अंकुशविना , यातून ना...

कर्जतकरांची सुरक्षा बेभरवशाची , कोरोना काळात सरकारी यंत्रणा अंकुशविना , यातून ना पत्रकार सुटले ना पोलीस..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

माथेरान येथील जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने दुःखद निधन झाले . लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संतोष पवार यांनी जवळ जवळ २५ वर्षे समाजातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून वृत्तपत्रात मांडून सरकारी यंत्रणा व नागरिकांच्या मधली कडी बनून महत्वपूर्ण कार्य केले.
मात्र त्याच सरकारी यंत्रणेने त्यांचा घात केला . या सरकारी यंत्रणेवर राजकीय अंकुश नसल्यानेच पत्रकार संतोष पवार यांच्यावर वेळेवर पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने ही वेळ आली , व आज ते आपल्यात नाहीत . यासाठी जबाबदार असणाऱ्या शासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय यंत्रणा देखील दोषी असल्याची चर्चा येथे होत असून म्हणूनच कर्जतकरांची सुरक्षा आत्ता बेभरवशाची झाली असल्याचे दिसून येत आहे.

खालापूर तालुक्यातील पोलीस हवालदार कळमकर यांचे ही निधन शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची बातमी ताजी असताना आज कर्जतचे जेष्ठ पत्रकार संतोष पवार देखील आज बळी ठरले . मात्र राजकीय यंत्रणा निर्जीव गप्पगार आहे . रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी चौकशीचे आदेश दिले , बस …. काम संपले ! कोरोनाच्या काळात संपूर्ण रायगडातील सरकारी यंत्रणा अंकुशविना काम करताना दिसत आहे.
जनतेवर समस्यांचे संकट असताना रोज वृत्तपत्रातून बातम्या झळकत असताना पालकमंत्री मात्र याकडे डोळेझाक करताना दिसत आहेत.अवकाळी पाऊस ,अतिवृष्टी , निसर्ग चक्री वादळ , त्यात कोरोनाचे संकट ! आजही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत , पैसे आले असे सांगण्यात येते मात्र अद्यापी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत , गॅस पाईप लाईन ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून गेली त्यांना अजून मोबदला मिळाला नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतो , अपंग – विकलांग – निराधार महिलांना पेंशन विना जगावे लागत आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिका एक वर्षांपासून बंद असताना कोरोना काळात ती चालू न होणे , म्हणजेच सरकारी यंत्रणा किती काम करते , व यावर राजकीय हस्तक्षेप किती आहे , याचे चित्र आता जनतेसमोर आले आहे , आणि या सडलेल्या यंत्रणेमुळेच आज जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांना जीव गमवावा लागला.

या अगोदर पासूनच १०८ ही रुग्णवाहिका बेभरवशाची आहे , वेळेवर येत नाही , यातील उपकरणे वेळोवेळी तपासली जाणे गरजेचे आहे , या यंत्रणेवर रुग्णांचे प्राण तरु शकतात , ही साधी बाब सरकारी आरोग्य यंत्रणेला समजू शकली नाही , ही खेदाची बाब म्हणावी लागेल .त्यामुळे नुसती चौकशी होणे गरजेचे नसून सडलेली शासकीय यंत्रणा सुधारणे गरजेचे वाटते , व यासाठी राजकीय यंत्रणा अजून सतर्क व सशक्त होणे गरजेचे आहे.
म्हणूनच पायाला चक्री लावून पालकमंत्री यांनी रायगडात काम करणे आज काळाची गरज आहे , हे म्हणणे वावगे ठरणार नाही . मात्र या झोपलेल्या निर्जीव आरोग्य यंत्रणेमुळेच आज जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचे दुःखद निधन झाले . त्यांच्या पत्रकारितेतील कार्यास अखेरचा सलाम..
- Advertisment -

You cannot copy content of this page