Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " आदेश बांदेकर " यांच्या प्रमुख उपस्थितीत " खेळ मांडियेला "...

कर्जतमध्ये ” आदेश बांदेकर ” यांच्या प्रमुख उपस्थितीत ” खेळ मांडियेला ” कार्यक्रमाचे आयोजन..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या दैनंदिन जीवनात महिलांना थोडे मोकळेपणा मिळण्यासाठी , सांसारिक जगाच्या बाहेर मनमुराद गप्पा – खेळ – गाणी – किस्से – उखाणे – नाव घेणे – स्पर्धा – यातूनच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रश्र्नोत्तरांचा व यातूनच मिळणाऱ्या बक्षिसांचा आनंद घेण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघात ” शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ” या पक्षाच्या माध्यमातून उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे महाराष्ट्राचे सचिव तथा आपल्या सर्वांचेच लाडके माहेरची साडी कार्यक्रमाद्वारे सर्वांच्याच मनामनात घर करून प्रत्येकांच्या घराघरात पोहचलेले ” भाऊजी ” आदेश बांदेकर यांच्या व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत ” खेळ मांडियेला ” हा बहारदार कार्यक्रम कर्जत नगर परिषद हद्दीतील पोलीस मैदानावर शनिवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी ठीक सायंकाळी ४ – ०० वाजता भव्य दिव्य ” हळदी कुंकू ” समारंभ व ” खेळ मांडियेला ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचे नियोजन कसे असेल , याची माहिती सर्वांना व्हावी , याकरिता आज शिवसेना जनसंपर्क कार्यालय ” शिवालय ” येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या पत्रकार परिषदेत उपजिल्हा प्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक नितीन दादा सावंत , जिल्हा महिला संघटीका तथा कर्जत न. प. नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, कर्जत तालुका संघटिका करुणा बडेकर , सुनिता विचारे विधानसभा संघटिका , मयुरी गजमल , भारती लोट , सुरेखा प्रधान , शितल पितळे , गीता पळसकर , कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे , संपर्क प्रमुख सुदाम पवाळी त्याचप्रमाणे शिवसेना – युवा सेना व महिला आघाडीचे प्रमख पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेनेचे पक्ष प्रमुख मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याचा मेळ जुळवत आजपर्यंत नेहमीच ” पाण्यापासून ते तांदळाच्या दाण्यापर्यंत ” नेहमीच मदतीचा हात देणारे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या पुढाकाराने ” माय भगिनिन्साठी ” संसारिक ताण घालवून विरंगुळा म्हणून मज्जेशीर खेळ – किस्से – गप्पा – गाणी – यांचा धमाल – संगीतमय – स्पर्धात्मक – चटपटीत प्रश्नोत्तरांचा व बक्षीसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम , तो ही आपले सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे . या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक माय भगिनीस मिळणार ” मायेची साडी ” तर बक्षिसांची लयलूटमध्ये दुचाकी , कलर टिव्ही , फ्रीज , वॉशिंग मशीन , मिक्सर , अशी विविध बक्षिसांची पर्वणी तर लकी ड्रॉ व विजेत्यांना पैठणी साडी मिळणार आहेत . स्पर्धा पास व स्पर्धा कुपन मिळवण्यासाठी आपल्या भागातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांच्याशी संपर्क साधावा. जरी आपल्यास पास घरपोच मिळाला नसला तरी पोलीस मैदान येथे प्रवेश करतानाच तो मिळणार असून येणाऱ्या सर्व महिलांना आणण्या – जाण्याची , नाश्ता , पाणी , यांची सोय तर अँब्युलन्स याची व्यवस्था देखील इच्छित स्थळी करण्यात आली असल्याचे उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत न. प. गट नेते नितीन दादा सावंत व जिल्हा संघटिका तथा नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

तरी या ” खेळ मांडियेला ” माय भगिनी साठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन – निमंत्रण व विनंती उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत न. प. गट नेते नितीन दादा सावंत व जिल्हा संघटिका तथा नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page