Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये कर्जात डूबलेल्या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ !

कर्जतमध्ये कर्जात डूबलेल्या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेच्या ठेकेदारांनी राज्यासहित जिल्ह्यात व तालुक्यात केलेल्या कामांचे जवळपास ” १२५०० कोटी ” रुपये बराच काळ थकीत राहिले आहे , त्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत . गणपतीच्या सणाच्या वेळी निधी उपलब्ध झाला नाही तर आता दिवाळीत तरी निधी उपलब्ध होईल , या आशेवर ठेकेदार होते , पण त्यांच्या पदरी निराशाच पडली व दिवाळी देखील अंधारात गेली आहे.
शासनाचे डोळे उघडण्यासाठी महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेने याविरुद्ध ” काम बंद आंदोलन ” करण्याचे ठरविले असून त्यास कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचा पूर्ण पाठींबा आहे . येत्या चार पाच दिवसात निधी उपलब्ध झाला नाही तर १ डिसेंबर २०२३ पासून सुरू असलेली सर्व कामे आहे त्या स्थितीत ठेवून काम बंद करण्यात येतील व याला सर्वस्वी शासन – प्रशासन जबाबदार असेल , असा संतप्त इशारा कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर व सचिव उदय पाटील यांनी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारांकडून होत असलेली तालुक्यातील कामे हि साखळी पद्धतीने एकमेकांवर अवलंबून राहून होत असतात . कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे सभासद असलेल्या छोट्या मोठ्या ठेकेदारांनी गेल्या वर्षभरात स्वतःच्या पैशातून पुल, शासकीय इमारती , रस्ते व ईतर कामे विविध योजनांतून मंजूर झालेली कामे पुर्ण केली आहेत.
पनवेल सा. बां.विभागातील ठेकेदारांचे जवळपास ५५ कोटी रुपये अडकून पडले आहेत . शासनाकडून प्रथमच गणपती आणि दिवाळीच्या सणांच्या वेळी यावर्षी कर्जतच्या कामांसाठीही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे कर्जाने घेतलेल्या मुद्दलीवर व्याज वाढत असून ठेकेदार चिंताक्रांत झाला आहे . उधारीवर घेतलेल्या साहित्याची देणी कशी द्यावी , हा प्रश्न ” आ ” वासून उभा राहिला आहे .एकीकडे देणीदार पैशाचा तगादा लावत असून कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा , या चिंतेत ठेकेदारावर आत्ता ” उपासमारीची ” वेळ आली असून , यावर शासन दरबारी लवकरच दखल घेण्याची संतप्त मागणी ठेकेदारांकडून होत आहे.

या आंदोलनाची माहिती देण्यासाठी संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर , तालुका सचिव उदय पाटील व कर्जत तालुक्यातील अनेक ठेकेदार यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page