Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये बहुजन समाज पार्टी व भीम गर्जना मित्र मंडळाच्या वतीने माता सावित्रीमाई...

कर्जतमध्ये बहुजन समाज पार्टी व भीम गर्जना मित्र मंडळाच्या वतीने माता सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडण्यासाठी केलेले प्रयत्न आज सार्थकी ठरले असून म्हणूनच आज स्त्री शिक्षणाचे पंख लावून गरुड भरारी घेत असताना दिसत आहेत , हे सर्व श्रेय विद्येची देवता सावित्रीमाई जोतिबा फुले यांना जात असून आज प्रत्येक स्त्री ने आपल्या घरात सावित्रीमाई फुलेंचा फोटो लावून त्यांना नतमस्तक होणे गरजेचे आहे , असा मोलाचा सल्ला फुले – शाहू – आंबेडकरी विचारधारेच्या वक्त्या जयाताई बनसोडे यांनी कर्जतमध्ये दिला.कर्जत नगर परिषद हद्दीत कर्जत बौद्धनगर येथे स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी २०२३ रोजी बहुजन समाज पार्टी व भीम गर्जना मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या . यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधान गौरव समितीचे आयु. सुभाष गायकवाड हे उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या की , त्याकाळी मुलींची शाळा चालविताना सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर ज्यांनी शेण फेकले आज त्यांची फुले झालेली आहेत . स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे काम आजही चालू आहे , म्हणूनच मग स्त्री तिच्या ध्येया पासून लांब होते , स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा आजही मारल्या जातात , मात्र स्त्रिया आरक्षणात निवडून आल्यावर पुरुष कारभार करतात , यावर प्रकाश टाकला . बलात्कार झालेल्या मुलीकडे समाज कसा बघतो , विधवा मुली , बलात्कार झालेल्या मुलींचा पुनर्विवाह तसेच संगोपन करण्याचं काम फुले दाम्पत्यांनी केले , काशी नावाच्या बाईच बाळ फुले यांनी दत्तक घेतले , तेच डॉ यशवंत फुले होते.
परिस्थिती वर मात करण्याची ताकद स्त्री मध्ये आहे , म्हणूनच तलवार उचलली तर माँ जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज झाले , तर पेन हातात घेतला तर सावित्रीमाई फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले हे सांगताना जयाताई बनसोडे पुढे म्हणाल्या की , संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हजारो अधिकार बहाल केले , माता फातिमा शेख याही शिक्षण घेऊन आज पुज्यनिय आहेत , शिक्षणाची कवाडे उघडणारे सावित्रीबाई व जोतिबा फुले यांना आजही भारतरत्न दिले गेले नाही . फोडा आणि राज्य करा , हे आजही सुरू आहे , मतदानाचा अधिकार आपल्याला मिळण्यासाठी बाबासाहेब यांना खूप त्याग करावा लागला , राज्यपाल कोश्यारी महापुरुषांबद्दल अपशब्द काढतात , म्हणूनच व्यवस्थेला धडा शिकविण्याचे काम अजूनही शाई तोंडावर फेकून आपण करत आहोत ,असा संताप त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कर्जत तालुक्यातील ” सावित्रीच्या लेकी ” ज्यांनी राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक क्षेत्रात तसेच आपल्या शासकीय नोकरीत उल्लेखनीय कार्य करून माँ जिजाऊ , माता सावित्रीबाई फुले , माता फातिमा शेख , माता रमाई , यांचे नाव रोशन केले अश्या सर्व कर्तबगार महिलांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले . यावेळी बहुजन समाज पार्टीचे रायगड जिल्हा प्रभारी सचिन भालेराव , विधानसभा अध्यक्ष योगेश गायकवाड , कर्जत शहर अध्यक्ष जितरत्न जाधव , जेष्ठ कार्यकर्ते सचिन चव्हाण , श्रीकांत गायकवाड , त्याचप्रमाणे भीमगर्जना मित्र मंडळाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते , महिलावर्ग उपस्थित होते . महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशा भगत व सुमेध जाधव यांच्या सुमधुर आवाजातील भीम गीते व महापुरुषांच्या प्रबोधन गीतांचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.

You cannot copy content of this page