Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत - गुंडगे रोड येथील उद्यम नगर परिसरात " शिवसृष्टी इमारतीत "चार...

कर्जत – गुंडगे रोड येथील उद्यम नगर परिसरात ” शिवसृष्टी इमारतीत “चार ठिकाणी चोरी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सध्याच्या अती उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना , त्यातच परीक्षा झाल्या असून लगीन सराई सुरू झाल्याने अनेक परिवार कर्जत सोडून बाहेर जात आहेत , नेमका हाच फायदा चोरटे घेत असून टाळे लावलेल्या घरांचा ” मागोवा व रेकि ” करून त्या घरात रात्रीच्या वेळी डाव टाकून घर लुटून नेण्याची घटना नुकतीच कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे रोडवर असणाऱ्या उद्यम नगर परिसरातील ” शिव सृष्टी ” या चार इमारती असलेल्या संकुलात तब्बल चार घरांची दरवाजे , कडी – कोयंडे , सेफ्टी लॉक फोडून सोने – चांदी – पैसे चोरून नेल्याची घटना शुक्रवार दि . १९ एप्रिल २०२४ रोजी रात्री घडली आहे . त्यामुळे या संकुलाबरोबरच येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिवसृष्टी संकुल हे चार बिल्डिंगचा परिसर असून या इमारतीत रहाणारे अरुण पाटील यांच्या फ्लॅट मधून ६० हजार रोख रक्कम , २ तोळ्यांचा सोन्याचा हार , ५ ग्रॅम चे सोन्याचे नाणे, चांदीचां बाऊल व चमचा असा ऐवज चोरांनी कपाट फोडून चोरून नेले ,गुलखेद मीना – खोपोली रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या फ्लॅट मधून १७ हजार रोख रक्कम , सोन्याची चैन , अंगुठी , असा ऐवज चोरून नेला आहे . चित्रा संजय पालव यांच्या फ्लॅटचे लोखंडी दरवाजा फोडून ९ ग्रॅम ची सोन्याची चैन , ३ ग्रॅम सोन्याची आंगठी व १५ हजार रोख रक्कम , तर वीणा विजय क्षिरसागर यांचे देखील घराचा दरवाजा फोडून त्यांच्याही घरातील ऐवज कपाट फोडून चोरांनी चोरून नेला आहे . सदरची प्राथमिक माहिती घर मालकांनी दिली आहे.

विशेष म्हणजे या चार हि घरातील कुटुंबे बाहेर असल्याने घरात कोणीच नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला . सेफ्टी लॉक , मजबूत दरवाजे फोडणे यासाठी चोरांनी अवजरांचा वापर केला असून चार इमारतीतील चार फ्लॅट फोडले असल्याने चोरांची संख्या देखील एक नसून तीन ते चार असावेत असा प्राथमिक अंदाज आहे . कर्जतमध्ये २ महिन्या नंतर थांबलेल्या चोऱ्या पुन्हा घडू लागल्या असल्याने आपल्या किंमती ऐवज घरात न ठेवता लॉकर चां वापर करावा , तर रोख रक्कम देखील घरात ठेवू नये , इमारतीत सी सी टी व्ही कॅमेरे असणे गरजेचे असून यामुळे पोलीस अधिकारी वर्गाला चोरांचा अंदाज येवून त्यांचा तपास करणे सोईस्कर पडते . सदरची चोरीची खबर कर्जत पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर भोईर हे तपास कामासाठी येवून चौकशी करत आहेत . या इमारतीत सी सी टिव्ही कॅमेरे नसल्याने चोरांचा शोध घेणे , पोलीस प्रशासना समोर एक आव्हानच म्हणावे लागेल.
- Advertisment -

You cannot copy content of this page