Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात घरफोडी करणाऱ्या पाच अट्टल आरोपींच्या आवळल्या मुसक्या..

कर्जत तालुक्यात घरफोडी करणाऱ्या पाच अट्टल आरोपींच्या आवळल्या मुसक्या..

कर्जत पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
मुंबई – पुणे मध्य रेल्वेचा कर्जत स्थानक गुन्हा करून सहीसलामत फरार होण्याचे ठिकाण असल्याने येथे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीला व गुन्हेगारांना वेळीच ठेचून काढण्याचे व मुसक्या आवळण्याचे काम कर्जत पोलीस ठाण्याचे कर्तबगार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अरुण भोर व त्यांची डॅशिंग टीम करत असतानाचे पहाण्यास मिळत आहे.

कर्जत तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या ५ अट्टल आरोपींना नुकतेच पकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.दिनांक ७ जुलै २०२१ रोजी रात्रीचे वेळेस मौजे वैजनाथ येथील .आय.पी. मार्केटिंग कंपनीचे ऑफिसचे खिडकीचे ग्रील उपकवून कामाकरिता असलेला कॉम्पुटर सेट व ग्रास कटिंग मशीन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले असल्याची तक्रार फिर्यादी पुंडलिक किसन ठोसर रा .वैजनाथ , ता .कर्जत यांनी दिली असता गुन्हा क्रमांक २०२ / २०२१ भा.द. वि.कलम ४५४ , ४५७ , ३८० , ४२७ ,अन्वये दि.१३ जुलै २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचा तपास हा गुन्हे प्रकटीकरण पथक ,कर्जत पोलीस ठाणे हे करत असताना सदर गुन्ह्यामध्ये हुमगाव ,ता . कर्जत येथे रहाणारा एक इसम याचा या घरफोडीत हात असल्याचा सुगावा खबऱ्या कडून लागला असता वेळ न दवडता त्या संशयीत इसमास सदर गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले.मात्र उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर त्यास विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यावर तो इसम पोपटासारखा बोलू लागला.

त्याने व त्याचे हुमगाव येथील ४ साथीदारांनी एक नाही तर तब्बल ८ घरफोडी कर्जत शहर , कडाव , गौळवाडी , जांभिवली , वैजनाथ , हुमगाव , असे गुन्हे मागील दोन वर्षांपासून केल्याचे तपासात कबूल केले.सदर या अट्टल आरोपीकडून आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यातील सोन्याची चैन ,रोख रक्कम , APPLE कंपनीचे दोन महागडे लॅपटॉप , एअरपॉड , ACER कंपनीचा कॉम्प्युटर सेट , सॅमसंग कंपनीचा महागडा एल.ई. डी. टिव्ही , पाच महागड्या बॅटरी , गवत कापण्याचे मशीन ,असा एकूण २५५९०० / – रुपयांचा माल हस्तगत करण्यात कर्जत पोलीसांना यश आले असून गुन्हे प्रकटीकरण पथक अधिक तपास करत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक अशोक दुधे , मा.अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर ,कर्जत पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली , कर्जत पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे , पोलीस अंमलदार / २१०१ सुभाष पाटील , पोलीस अंमलदार / २२८१ भूषण चौधरी , पोलीस अंमलदार / ५०९ गणेश पाटील , पोलीस अंमलदार / ४६७ अश्रूबा बेद्रे यांनी केलेली आहे .सदरच्या गुन्ह्यातील अट्टल ५ घरफोडी करणाऱ्या आरोपींना पकडून गुन्हे उघडकीस आणल्याने कर्जत पोलीस ठाण्याच्या या बहाद्दर जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page