Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात वर्षा सहलीला बंदी असताना बंदोबस्ताच्या अभावामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू..

कर्जत तालुक्यात वर्षा सहलीला बंदी असताना बंदोबस्ताच्या अभावामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू..

भिसेगाव -कर्जत (सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील वर्षा सहलीवर यावर्षीही  बंदी घालण्यात आली आहे.कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने ८ ऑगस्ट २०२१ पर्यन्त ही जमाव बंदी लावली असून सर्व धबधबे आणि धरणे यांच्या आसपास प्रवेश करू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र वर्षा सहलींवर बंदी , त्या विभागात १४४ कलम फक्त कागदावरच राहिला असून आज पर्यंत वर्षा सहलीस आलेल्या ४ जणांचे पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याने संबंधित अधिकारी आदेशाची अंमलबजावणी करतात की कसे ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाला सुरूवात झाली की कर्जत तालुक्यातील परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होत. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरूवात होते. येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगर कपारीतील फेसाळत वाहणार्या धबधब्यांमुळे विकेंडला येणा-यांची भलतीच गर्दी होत असते.ते मनाला मोहवणारे दृश्य बघून तरुण -तरुणी ,विवाहित जोडपे ,तर लहान बालकांसहित आलेली कुटुंबे वेडावून जातात .मद्य पिऊन डोंगरावर चढणे , खोल पाण्यात उतरणे यामुळे अनेकांचे प्राण गेल्यामुळे प्रशासनाला जमाव बंदीचा आदेश लागू करण्याची वेळ सातत्याने येत आहे.

या गर्दीला रोखणे अशक्य असते .त्यातून या भागाचा पर्यटन व्यवसाय हा देखील काही वर्षे उंचावत गेला होता.मात्र मागील तीन वर्षात सातत्याने वाढते अपघात आणि येणारी जमावबंदी यामुळे व्यवसायावर देखील परिणाम होऊ घातले आहेत. त्यामुळे जमावबंदी बाबत संमिश्र प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करीत असून सोलनपाडा ग्रामस्थ तर थेट आमच्याकडे पर्यटक नकोच असे जाहीरपणे सांगत आहेत.

तर आषाणे धबधबा येथे पर्यटकाना आडवु नका यासाठी स्थानिक नागरिक प्रशासनाशी भांडत आहेत.सतत घडणारे अपघात लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून लागू करण्यात आलेली जमावबंदी कर्जत तालुक्यातील धरणे,पाझर तलाव, धबधबे ,नद्या आदी ठिकाणी पाच पेक्षा अधिक जमावाने येण्यास जिल्हा प्रशासनाने बंदीबाबत जाहीर केली आहे. २०१६ ,२०१७ आणि २०१८  मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी सहलीसाठी आलेल्या मुंबईच्या पर्यटकांचे पाण्यात बुडून ,वाहून जाऊन , डोंगरावरून पडून मृत्यू झाले होते. तर तालुक्यातील स्थानिक रहिवाशी कशेळे येथील दिलीप खंडागळे ,पिंगळस येथील सागर पिंगळे , या दोन तरुणांचा गेलेला जीव तालुक्यात सर्वांच्याच जिव्हारी लागला.

त्यामुळे २०१८ मध्ये तब्बल तीन महिने धरणे आणि धबधबे यांच्या परिसरात जाण्यास १४४ कलमाखाली जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. आत्ताही मज्जाव असूनही मोठ्या प्रमाणात वर्षा सहलीसाठी पर्यटक येत आहेत आणि १४४ कलम फोल ठरला त्यामुळे या दोन वर्षी कोरोना काळात प्रशासन अधिक ताकदीने जमाव बंदी आदेशाची अमलबजावणी लागू करणार असल्याचे चित्र असताना आतापर्यंत ४ जणांचे बळी गेले आहेत.

हा निर्णय जिल्हा प्रशासनाने पोलीस दलावर मोठी जबाबदारी या निमित्ताने टाकली आहे. सोलनपाडा पाझर तलाव,पाली भूतीवली धरण,आषाणे- कोषाणे धबधबा,पेब किल्ला,पळसदरी तलाव,बेडीसगाव धबधबा, जुम्मापट्टी धबधबा,टपालवाडी आदी ठिकाण धोक्याचे असल्याने कर्जत तालुक्यात मागील १० वर्षात वर्षासहल साजरी करण्यासाठी आलेले आणि जिवंत घरी न पोहचलेल्या पर्यटक यांनी शंभरीच्या वर संख्या गाठली आहे  , ही स्थिती निश्चितच भयावह असून केवळ मद्यपान करून पाण्यात उतरणारे आणि धोक्याच्या सूचना न ऐकणारे पर्यटक यांचा प्रमुख समावेश आहे.हि जमावबंदी आदेश तंतोतंत पाळल्यास बेधुंद होणाऱ्या तरुण तरुणींवर मज्जाव येऊन मृत्यूचे तांडव थांबणार आहे.

यासाठी पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी त्यांची पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे .मात्र मा.जिल्हाधिकारी व मा. पोलीस अधिक्षक रायगड , यांचे आदेश कागदावरच रहात असून विकेंड ऑफ शनिवार – रविवारी तरी चोख बंदोबस्त पोलीस शिपाई ,स्थानिक ग्रामपंचायत , होमगार्ड,व ग्रामस्थांच्या मदतीने अंमलबजावणी करू शकतात ,मात्र बंदोबस्ताच्या अभावामुळे अजून किती जणांचे मृत्यू पहाण्यास मिळणार , हे येणारा कालच ठरवणार आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page