Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत मधील पाण्याच्या भीषण समस्येवर सर्व पक्षीय बैठकीची गरज !

कर्जत मधील पाण्याच्या भीषण समस्येवर सर्व पक्षीय बैठकीची गरज !

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची संतप्त मागणी..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली चार महिन्यांपासून कर्जत नगर परिषद हद्दीतील सर्वच प्रभागात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे . त्यामुळे त्याचा परिणाम महिला वर्गांच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याने महिलांमध्ये पालिकेच्या ” बेजबाबदार ” कामामुळे संताप खदखदत असून यावर त्वरित उपाययोजना काढण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी – कार्यकर्ते – महिला वर्गाची बैठकीची गरज असून , तरच यातून काही तोडगा निघू शकतो , अशी प्रमुख संतप्त मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कर्जत शहर अध्यक्षांनी केली आहे.

कर्जत न.प.हद्दीत एकूण १८ प्रभाग आहेत , यामध्ये भिसेगाव , गुंडगे , आकुरले , दहिवली , मुद्रे , नाना मास्तर नगर , कोतवाल नगर , या परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे . कमी दाबाचा व कमी पाणी येत असल्याचे यापूर्वीच भिसेगाव येथील नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत , तर कालच पंचशील नगर – गुंडगे येथील महिला वर्गांनी पालिकेला घेराव घातला होता , तर बामच्या मळ्यातील व मुद्रे येथील अनेक महिलांनी याआधी पाण्याच्या समस्येच्या तक्रारी केलेल्या होत्या , मात्र अद्याप पर्यंत या भीषण पाणी टंचाईवर पालिका प्रशासन व सत्ताधारी पक्ष उपाय शोधू शकले नाहीत.

ज्या पेज नदीवर कर्जत पाणी योजना आहे , ती पेज नदी बारामाही तुडुंब वहात असते , मग पाणी उपसा ज्यादा प्रमाणात का केला जात नाही ? वीज कंपनीची वीज , तर टाटा पॉवर ची कर्जतमधून वीज प्रवाह जात असताना पालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाला विजेचे नियोजन देखील करता येत नाही.
साठवण टाकीत वाढ करा , हि मागणी देखील विचारात घेतली जात नाही , साधे पहिल्या माळ्यावर देखील पाणी चढत नसल्याने सर्व नागरिक बेकायदेशीर मोटार लावून पाणी खेचत आहेत , यावर देखील पालिकेचे अंकुश दिसत नाही . मध्यंतरी नळांना मीटर बसविले त्यात देखील नियमितपणा आणला नसून यांत देखील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसण्यात येते , त्यातच पाणी अभियंता देखील कायमस्वरूपी नसल्याने फक्त २ दिवसच ते कर्जत येथे रुजू असल्याने कर्मचारी व कामगार चुकीच्या पद्धतीने काम करतात , यावर देखील कुणाचा अंकुश नाही , त्यामुळे दोन वेळा पाणी सोडण्याचे कर्जतकरांचे स्वप्न अखेर स्वप्नच रहाणार का ? असा संतप्त सवाल पाण्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महिलावर्ग व कर्जतकर करताना दिसत आहेत.
यातून पालिका प्रशासन व सत्ताधारी कर्जतकरांना नियमित व भरपूर पाणी देण्यास सपशेल अपयशी ठरले असल्याने सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी करावे , अशी संतप्त मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page