Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे पॅसेंजर असो. ची आठ वर्षांत एक हि बैठक नाही ,मग...

कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. ची आठ वर्षांत एक हि बैठक नाही ,मग समस्या सुटणार कश्या !

बेकायदेशीर कमिटी बरखास्त करण्याची प्रभाकरदादा करंजकर यांची मागणी..

भिसेगाव – कर्जत( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे स्थानक सध्या चहूबाजूने समस्यांनी वेढले असताना रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटता सुटत नाहीत.याबाबतीत वृत्तपत्रातून बातम्या देवून , निवेदन व आंदोलनाचा इशारा देवून तसेच येथे तपासणी करायला येणाऱ्या अधिकारी वर्गाला सांगून देखील रेल्वे प्रवाश्यांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या ” जैसे थे ” असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे कर्जतकर रेल्वे प्रवासी व नागरिकांचा संताप अनावर होत असताना या समस्या सोडविण्यासाठी तसेच रेल्वे प्रवासी वर्गाच्या वतीने रेल्वे प्रशासनाला वेठीस आणून त्यांच्याशी चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्यास तयार केलेल्या ” कर्जत रेल्वे पॅसेंजर असोशियशन ” च्या अध्यक्षीय कमिटीची गेली आठ वर्षांत एकही सार्वजनिक बैठक झाली नसल्याचे धक्कादायक माहिती रेल्वे पॅसेंजर असो. चे माजी अध्यक्ष प्रभाकरदादा करंजकर यांनी दिली असल्याने म्हणूनच कर्जतकर रेल्वे प्रवासी वर्गाच्या समस्या सुटत नाहीत त्यामुळे हि कमिटी बरखास्त करण्याची मागणी देखील त्यांनी केली असून हि माहिती समजताच या कमिटीवर सर्वांचाच संताप अनावर झाला आहे.

मागील आठ वर्षांपूर्वी २५ ऑक्टोंबर २०१५ ला कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. चे माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर यांची अध्यक्षीय कमिटी बरखास्त होवून नवीन कमिटी स्थापन झाली होती. या कमिटीचा कार्यकाळ फक्त ३ वर्षांचा असताना आताची कमिटी आठ वर्षे झाली तरी बरखास्त कशी झाली नाही , असा सवाल हि त्यांनी उपस्थित केला आहे . कर्जतकर रेल्वे प्रवासी वर्गाला सोई सवलती मिळत नसल्याची ओरड येथे वारंवार होत असताना रेल्वे प्रवासी कमिटी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जाऊन याबाबतीत काहीच का करत नाहीत , याबद्दल त्यांनी हित संबंध जपतात का , असा संशय देखील व्यक्त केला.
तर आमची कमिटी असताना सल्लागार असलेले प्रवासी संघाचे काही ज्येष्ठ सभासदांनी बॅनर झळकावून तक्रारी मांडल्या असताना आता ते ज्येष्ठ सभासद मूग गिळून का गप्प आहेत ? आठ वर्षांत रेल्वे समस्यांबाबत सार्वजनिक ठिकाणी आमंत्रित करून एक हि बैठक झाली नाही , हे त्यांना दिसत नाही का ? असा खरमरीत सवाल त्यांनी जेष्ठ सभासदांना केला आहे.

कोरोना महामारी काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या व कर्जत स्थानकात पूर्वी गाड्यांना थांबा असलेल्या मात्र आता थांबा नसल्याने प्रवासी वर्गाला कल्याण येथे जावे लागते , त्यामुळे खूप त्रास होत आहे , कर्जत – पनवेल लोकल मार्ग अद्यापी झाला नाही , अपघात झाल्यावर ॲम्बुलन्स ची व्यवस्था नसल्याने अपघातग्रस्त व्यक्तीला स्ट्रेचरवर धावत पळत होमगार्ड घेवून जाताना अनेकांनी पाहिले आहे , अश्यामुळे अनेकांना योग्यवेळी उपचार मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे , कर्जत रेल्वे स्थानकावर शौचालयाची सेवा रात्री १० वाजताच बंद होत असल्याने रेल्वे प्रवासी वर्गाने नैसर्गिक विधी करण्यास कुठे जायचे , महिला वर्गाची गैरसोय होत असल्याने रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे. रेल्वे स्थानकात एटीएम सेवा नसल्याने बाहेरील प्रवासी वर्गाची खूपच गैरसोय होत आहे.
रेल्वे परिसरात डांबरीकरण करणे , अपघाताला घातक ठरणारे झाड तोडणे , गुंडगे बाजूला असलेल्या भागात तिकीट घर असणे , अस्ताव्यस्त असलेली बेकायदेशीर पार्किंग हटविणे , जिन्यावरील वारंवार बत्ती गुल होणे , स्वच्छतेचा अभाव , काही भागात दिवे नसणे , भिसेगावं गेट येथील तिकीट घर चार वाजताच बंद होणे , अश्या विविध समस्यांनी ग्रासलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाची हि दशा या ” कर्जत रेल्वे पॅसेंजर असो.” ने केली असून सर्व कर्जतकर नागरिकांनी एकत्र येवून या बेजबाबदार कमिटीस पायउतार करावे , हि कमिटी बेकायदेशीर पणे आठ वर्षे झाली अद्यापी चेंज झाली नसल्याने बरखास्त करून नवीन कमिटी स्थापन करण्याची संतप्त मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असो.चे माजी अध्यक्ष प्रभाकर दादा करंजकर यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page