Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत स्थानकावर बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करा , अन्यथा रेल रोको...

कर्जत स्थानकावर बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करा , अन्यथा रेल रोको करणार – उत्तम भाई जाधव..

सुस्त रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा ईशारा…

भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत रेल्वे स्थानक हे मुंबई – पुणे रेल्वे प्रवासाचा मध्य समजले जाते . पूर्वी या स्थानकात प्रत्येक गाडी थांबली जात असायची.पुण्याला गाडी जाणार तर बँकर ( इंजिन ) लावायला , तर मुंबई ला जाणार असेल तर बँकर काढायला . त्यातच कर्जतला थांबा असल्याने येथील प्रवासी देखील उतरत होते .मात्र कोरोना महामारीच्या काळात नागरिकांचा संपर्क तोडण्यासाठी बंद केलेल्या गाड्या कोरोना संपला तरी सुस्त रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या नसल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे.

पुण्यावरून निघालेली गाडी कर्जतला थांबत नाही , ती डायरेक्ट कल्याण येथे थांबत असल्याने प्रवाश्यांना ही बाब त्रासदायक वाटत आहे.आज कोरोना संपून एक वर्षाचा कालावधी होऊन गेला तरी रेल्वे प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही , म्हणूनच या मस्तवाल रेल्वे प्रशासनाच्या सुस्त कारभाराला जागे करण्यासाठी ” रेल रोको ” करणार असल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला क्रोध ईशारा दिला आहे.


कोरोना काळानंतर आजीमितीस सह्याद्री , कर्जत पूना पॅसेंजर , नागर कोईल , या रेल्वे गाड्या बंद आहेत , तर कोयना , हैद्राबाद ,सिद्धेश्वर एक्स्प्रेस , साई शिर्डी या गाड्यांना कर्जत थांबा नाही , त्यामुळे नागरिकांना इच्छित स्थळी पोचण्यास अनंत अडचणी येत आहेत . सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे , कामगार वर्गाचे , रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे , रुग्णालयातील महिला कर्मचारी वर्गाचे , तर आपल्या गावी जाऊन परतणाऱ्या प्रवाश्यांना कर्जत थांबा नसल्याने खूपच त्रास होत आहे . त्यातच गरिबांची गाडी असलेली कर्जत – पूना पॅसेंजर बंद केल्याने गरीब – गरजू प्रवाश्यांना जादा खर्च करून प्रवास करावा लागतो.यामुळे रेल्वे प्रवाश्यांत रेल्वे प्रशासना विरोधात प्रचंड संताप पसरला आहे.

म्हणूनच रेल्वे प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी सकाळी हाय – फाय उच्च अधिकारी वर्गास घेऊन जाणारी पूना – मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस या गाडीच्या वेळी ” रेल रोको आंदोलन ” केल्यास डी आर एम जागा होईल , व कर्जत स्थानकात बंद असलेल्या व थांबा नसलेल्या गाड्या त्वरित सुरू होतील , रेल्वे प्रशासन जर नागरिकांच्या संतापाच्या उद्रेकाची वाट पहात असेल तर एका महिन्यांत गाडया सुरू न झाल्यास सर्व प्रवाशांना घेऊन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून ” रेल रोको आंदोलन ” करणारच , असा ईशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे . व रेल्वेच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. याबाबतीत रेल्वे प्रवासी संघटना कर्जत रेल्वे पॅसेंजर असो . ने देखील मौन व्रत घेतले असून , रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष केतनभाई शहा , महासचिव प्रभाकर दादा गंगावणे यांनी कर्जतकर प्रवाश्यांना न्याय देण्यासाठी रेल्वे प्रशासनाला जाब विचारून गाड्या त्वरित सुरू व थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत , अशी मागणी देखील जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page