Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळकार्ला परिसरातील ऐतिहासिक स्थळांवर 18 डिसेंबर रोजी हेरिटेज वॉक…

कार्ला परिसरातील ऐतिहासिक स्थळांवर 18 डिसेंबर रोजी हेरिटेज वॉक…

मावळ (प्रतिनिधी): मळवली भाजे येथील बालग्राम या संस्थेच्या वतीने भाजे लेणी ते लोहगड किल्ल्यादरम्यान हेरिटेज वॉकचे आयोजन दि.18 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
या हेरिटेज वॉकमध्ये सामाजिक , राजकीय , क्रीडा , सांस्कृतिक , कला , चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जवळपास सात ते आठ हजार दुर्गप्रेमी , निर्सगप्रेमी व नागरिक सहभागी होणार आहे .संपर्क बालग्रामचे सचिव अमितकुमार बॅनर्जी , संचालिका नवनीता चटर्जी , अनुज सिंह , प्रदीप वाडेकर , सतीश माळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली .
मावळ तालुक्यातील भाजे लेणी , कार्ला लेणी , बेडसे लेणी , लोहगड किल्ला व विसापूर किल्ला या पुरातन व ऐतिहासिक भागाचा पर्यटनात्मकदृष्ट्या विकास व्हावा या करिता भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संपर्क बालग्राम या अनाथाश्रम चालवणाऱ्या संस्थेच्या वतीने मागील पाच वर्षांपासून हेरिटेज वॉक ही नावीन्यपूर्ण संकल्पना समाजासमोर ठेवली आहे.अतिशय प्राचीन व जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी कार्ला , भाजे व बेडसे लेणी सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले लोहगड व विसापूर या किल्ल्यांचा विकास झाल्यास पर्यटनात्मकदृष्टया आजूबाजूच्या ग्रामीण भागासह मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.
तसेच प्राचीन वास्तूंचे रक्षण , त्यांची स्वच्छता , संस्कृती आणि इतिहासाची आठवण लोकांमध्ये नेहमी जागृत राहावी आणि परिसरातील दुर्लक्षित , आदिवासी , अनाथ , गरीब विद्यार्थांना सरंक्षण देणे त्यांना मदत करण्याची लोकांना जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने संपर्क संस्थेच्या वतीने हेरीटेज वॉक सुरू केला आहे .
या वॉकदरम्यान नागरिकांना महाराष्ट्रातील कलेचा वारसा वासुदेव , सोंगाडी , पोवाडे म्हणणारे शाहीर , जात्यावर दळण दळणाऱ्या ग्रामीण महिला , भजन , कीर्तन , मल्लखांब , लाठीकाठी , तलवारबाजी , सांस्कृतिक कार्यक्रम पहायला मिळणार आहेत . सोबतच भाजलेले शेंगदाणे , उकडलेले मक्याचे कणीस , वडापाव , चहा व सरते शेवटी वांग्याचे भरित , ठेचा व पिठंल भाकरीचा मराठमोळा मेजवानीचा बेत सहभागी नागरिकांना मिळणार आहे .
मावळ पंचायत समिती , लोणावळा नगरपरिषद , भाजे लोहगड ग्रामपंचायतीसह परिसरातील ग्रामपंचायती , विविध कंपन्या , सामाजिक संस्था , शाळा महाविद्यालये , भारतीय भूगर्भशास्र संस्था यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून या हेरिटेज वॉकमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. वॉक संदर्भात अधिक माहिती साठी www.samparcheritagewalk . com या संकेत स्थळावर संपर्क साधावा , असे आहवान संस्थेचे संस्थापक संपर्क प्रमुख अमितकुमार बॅनर्जी यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page