Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाकैवल्य धाम योग संस्थेचा १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा..

कैवल्य धाम योग संस्थेचा १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा..

लोणावळा : ( प्रतिनिधी श्रावणी कामत ) लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये “१० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस ” शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिवसाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. तदनंतर प्रमुख पाहुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष,ॲड राजेंद्र उमप, कैवल्यधाम योग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बंदिता सतपते, ब्रिगेडियर (निवृत्त ) श्री सुहास धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व महिला वर्ग, कैवल्याधाम संस्थेतील अधिकारी वर्ग, लोणावळा शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांना कैवल्यधाम संस्थेवर रचलेले योग व्हिडिओ गीत तसेच संस्थेच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रम आणि संस्थेस भेटी दिलेल्या मान्यवरांचे व्हिडीओ सादरीकरण संक्षिप्त स्वरूपात दाखविण्यात आले.
संस्थेचे अधिकारी श्री बर्नार्ड सर यांनी प्रमुख पाहुणे वकील श्री राजेंद्र उमप यांचा अल्प परिचय करून दिला आणि त्यांना शाल आणि मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यानंतर प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या संक्षिप्त भाषणातून त्यांनी भारताचे पंतप्रधान सन्मानीय श्री नरेंद्र मोदी जी यांनी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरु केला याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या. सकाळी ८.४५ ते ९.३० वाजेपर्यंत Common योगा प्रोटोकॉल प्रमाणे कैवल्यधाम संस्थेच्या योगाचार्या श्रीमती संध्या दीक्षित यांनी योग प्रशिक्षण घेतले.
शेवटी उपस्थितांसाठी सात्विक नाष्टा चे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील कार्ला लेणी व भाजे लेणी, MTDC कार्ला, देहूरोड कैनटोनमेंट, लोणावळ्यातील L & T Traning Centre, INS शिवाजी येथे कैवल्यधाम संस्थेतर्फे योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. भाजे लेणी येथे संपर्क बालग्राम, भाजे येतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
तसेच कैवल्य विद्या निकेतन शाळा, कैवल्यधाम यांनी लोणावळ्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण वर्गाचे विशेष आयोजन केले होते. १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ( Maharashtra Tourism ) तसेच लोणावळ्यातील ॲड. संजय गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.
१० व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योग प्रशिक्षिका कुमारी ममता बिष्ट यांनी केले आणि आभार प्रदर्शन ॲड. संजय गायकवाड यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी केले होते. लोणावळा येथे १९२४ साली स्वामी कुवलयानंद जी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती.२०२४ साली संस्था आपली शतकपूर्ती करीत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page