Saturday, July 27, 2024
Homeपुणेमावळकोंडीवडे येथील अल्पवयीन मुलीचा परराज्यात शोध काढण्यात वडगांव मावळ पोलिसांना यश…

कोंडीवडे येथील अल्पवयीन मुलीचा परराज्यात शोध काढण्यात वडगांव मावळ पोलिसांना यश…

मावळ (प्रतिनिधी): मावळातील कोंडीवडे गावातील एक पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी दि.10 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वा.च्या सुमारास बेपत्ता झाली होती. या संदर्भात पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेत निर्भयास व आरोपिस उत्तराखंड येथून ताब्यात घेऊन शुक्रवारी दि.25 रोजी वडगांव मावळ पोलीस ठाण्यात आणले आहे . पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगी कोंडीवडे येथे तिच्या वृद्ध आजीकडे राहुन शिक्षण घेत आहे.या अल्पवयीन मुलगी दि.10 नोव्हेंबर रोजी रात्री 1 च्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने तीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची फिर्याद वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली होती. या फिर्यादी मध्ये पिडीतीचे वडीलांनी गावातील ऋषिकेश शरद गायकवाड यानेच बालिकेस फूस लावुन पळवून नेले असावे असा संशय व्यक्त केला होता . अपहरण झालेली मुलगी अल्पवयीन असल्याने वडगाव मावळ पोलीसांनी तात्काळ बालिकेचा शोध घेण्यास सुरूवात केली व संशयित आरोपीच्या घरी जावुन त्याच्या नातेवाईकांकडे तसेच आजुबाजुच्या परिसरामध्ये चौकशी केली असता , संशयित आरोपी हा सुद्धा घरी नसल्याचे दिसुन आले.
त्यामुळे उपविभागिय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी अपहरित अल्पवयीन बालिका व संशयित आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण केले असता , पिडीत बालिका ही संशयित आरोपीच्या बरोबर असल्याचे दिसुन आले . आरोपीने बालिकेस लोणावळा मार्गे ठाणे व तेथुन पुढे ऋषिकेश हरिद्वार राज्य उत्तराखंड येथे घेऊन गेला असल्याचे दिसुन आल्यावर पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव , पोलीस हवालदार सचिन काळे , महिला पोलीस हवालदार निर्मला उप्पु , पोलीस नाईक शशिकांत चोपडे यांचे पथक उत्तराखंड राज्यामध्ये रवाना कले . पोलीस पथक उत्तराखंड येथे दाखल झाल्यानंतर वडगाव मावळ पोलीसांना नवीन प्रदेश व भाषेमुळे शोधकार्यामध्ये अडचण निर्माण होवु लागली.
त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी उत्तराखंड राज्यातील वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर घोडके यांना संपर्क करून वडगाव मावळ पोलीस पथकांस योग्य ते सहकार्य करण्या बाबत विनंती केल्याने कोतवाली पोलीस ठाणे , हरिद्वार उत्तराखंड येथील पोलीस पथकाने वडगाव मावळ पोलीस पथकास बरोबर घेवून , मोबाईल टॉवर लोकेशनवरून मुलीचे व आरोपीचे शोधकार्य चालू केले असता , एका लॉजमध्ये निर्भया व आरोपी मिळून आल्याने , वडगाव मावळ पोलीस पथकातील महिला पोलीस अमलदार श्रीमती निर्मला उप्पु यांनी बालिकेस ताब्यात घेऊन पोलीस पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळुन त्यास वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आनले आहे.
संशयित आरोपी हा त्याच्याकडील तसेच पिडीत बालिकेकडील मोबाईल फोन वारंवार बंद करून ठेवत असल्याने तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या पथकांस व शोधकार्यामध्ये असलेले पथकास अत्यंत अडचनींचा सामना करावा लागला.तसेच उत्तराखंड राज्यामध्ये कडाक्याची थंडी असल्याने शोधकार्यास मर्यादा येत होत्या तरी सुद्धा पोलीस पथकाने उमेद न सोडता , कसोशीने हरिद्वार येथील प्रत्येक हॉटेल व लॉजची तपासणी करून अपहरित बालिकेस तसेच आरोपीस अल्पावधीतच शोधुन काढल्याने मावळ परिसरातील सर्व स्तरातून पोलीसांचे कौतुक केले जात आहे.
कोरोना कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर सुरू झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना अँड्रॉइड मोबाईल फोन घेवुन दिले आहेत . परंतु नियमित शाळा चालू झालेनंतर सुद्धा अल्पवयीन मुलांकडुन मोबाईल फोनचा व सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणामध्ये वापर सुरू आहे.
त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचे मोबाईल वापरावर देखरेख ठेवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे . सदयस्थितीमध्ये मोबाईल फोनवर समाजमाध्यमाद्वारे अनोळखी व्यक्तींची ओळख होवुन त्यातुन अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत . तसेच पोर्नोग्राफी व्हिडीओ सुद्धा सहज उपलब्ध होत असल्याने , अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलत आहे . अल्पवयीन बालिकांना फुस लावुन पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसुन येत आहे . त्यामुळे पालकांनी याबाबत जागृत होवुन , अल्पवयीन मुलांचे मोबाईल फोन वापरावर देखरेख ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page