Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकोरोना काळात माथेरान मधील खरे देवदूत डॉ. प्रशांत यादव..

कोरोना काळात माथेरान मधील खरे देवदूत डॉ. प्रशांत यादव..

माथेरान (दत्ता शिंदे ) अन्य आजारांपेक्षाही सध्याच्या वर्तमानात कोरोना या महाभयंकर समजल्या जाणाऱ्या आजार झालेल्या रुग्णांची सुरक्षाकवच( किट्स,मास्क) घातल्याशिवाय तपासणी करणे म्हणजे एकप्रकारे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आव्हान होते कारण हा आजार सुध्दा गंभीर स्वरूपाचा जाणवतो.

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्यास ती अगदी सहजपणे त्या व्यक्तीच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तीला सुध्दा आपोआपच जडत जाते. अशाच परिस्थितीत चुकूनही मास्क न लावल्यास संपर्कात येणाऱ्याना सुध्दा या आजाराशी सामना करावा लागतो.पहिल्या लॉक डाऊन काळात माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यात पुरेशा प्रमाणात औषध साठा सुध्दा उपलब्ध नसल्याने काहींना आपले प्राण गमवावे लागले होते.

त्यातूनही शिल्लक असलेल्या औषधांचा वापर करून वेळप्रसंगी रुग्णांना धीर देत सर्वसामान्य गोरगरीब कोरोना रुग्णांना अन्य ठिकाणी न हलविता माथेरान मध्येच उपचार करून जीवदान देण्याची महत्वाची भूमिका पार पाडली आहे ते म्हणजे एमबीबीएस डॉ. प्रशांत यादव यांनी.त्यांच्यामुळेच आमची व्यक्ती आज सहीसलामत असल्याचे अनेक रुग्णांचे नातेवाईक बोलत आहेत.

माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यात आजवरच्या कार्यकाळात एमबीबीएस डॉक्टरांना पुरेशा सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद जरी कुचकामी ठरली असली, दवाखान्यात सुध्दा अंतर्गत मतभेद आजही कायम असल्याचे बोलले जात आहे एमबीबीएस डॉक्टर्सना इथे टिकून दिले जात नाही.

ज्या ज्या कर्मचाऱ्यांची जी पदानुसार कामे आहेत ती कामे संबंधित कर्मचारी करीत नसून आराम कसा मिळेल हा खेळ आजही सुरू आहे. नगरपरिषदेच्या कार्यालयातील एखाद्या शिपायामार्फत कामे पूर्ण करून घेतली जात आहेत.याकडे लोकप्रतिनिधी सुध्दा नाईलाजाने कानाडोळा करताना दिसतात. यातूनही कुणालाही त्रास न देता वेळप्रसंगी स्वतःच आपल्या पदाचा विचार न करता काहीही कामे करत अशा परिस्थितीवर मात करून केवळ रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे एकमेव एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रशांत यादव यांचे नाव आवर्जुन घेतले जात आहे.

यापूर्वी देखील इथे एमबीबीएस डॉक्टर कार्यरत होते परंतु त्यांनी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवर ईलाज करण्याऐवजी स्वतःच्या घरात पेशंटला बोलावून ईलाज करत व्यवसायाचे साधन निर्माण केले होते.

आजमितीला डॉ. प्रशांत यादव आणि त्यांच्या साथीला डॉ. उदय तांबे,आरोग्य अधिकारी सदानंद इंगळे, परिचारिका स्नेहा गोळे, राजू वाघेला, वनिता दिघे, प्राजक्ता शिंदे, सखाराम व अन्य रुग्णवाहिका कर्मचारी, सहकारी हे उत्तम प्रकारे रुग्णाला सेवा देत आहेत.दरदिवशी इथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशांत यादव यांना सुध्दा या आजाराची लागण झाली होती त्यामुळे खचून न जाता परिस्थितीचा सामना केल्यास, शासनाचे नियम व अटींचे पालन केल्यास निश्चितपणे कोरोनावर मात करता येऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

माथेरान मध्ये सुद्धा कोरोना रुग्णांचा आकडा शंभरीच्या दिशेने आगेकूच करत आहे. केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या माथेरान करांसमोर लॉक डाऊन मुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कदाचित पुढील व्यावसायिक हंगामाचा शेवटचा मे महिना सुध्दा लॉक डाऊन मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे निदान प्रत्येकाने आपल्या घरात बसून शक्यतो कुणाच्याही संपर्कात येण्याचा प्रयत्न न करता कोरोनाचा मुकाबला करावा असेही प्रशांत यादव यांनी सांगितले.

- Advertisment -

You cannot copy content of this page