लोणावळा : खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट येथे झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. ही माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.
ह्या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून शिवदुर्ग मित्र रेस्कू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलिंग पॉइंटजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी जावून पाहिले असता आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक क्रेटा गाडी (क्रमांक MH 17 CM 9697) उभी होती. गाडीची माहिती घेतली असता गाडी मालकाचे नाव अण्णा बादशहा गुंजाळ (रा. खंडगाव, संगमनेर, अहिल्यानगर) असल्याचे समजले.
पोलिसांनी गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क केल्यानंतर ही गाडी अण्णा गुंजाळ यांची असून ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्याशी संपर्क केल्यावर गुंजाळ हे तिथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून तीन दिवसांपासून गैरहजर होते. त्यांचा फोन लागत नव्हता आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार होती, असे पोलिसांना समजले.