Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळाखाजगी शाळांकडून पालकांची शुल्कसाठी अडवणूक..शिक्षण विभागाचे दुर्लक्ष....

खाजगी शाळांकडून पालकांची शुल्कसाठी अडवणूक..शिक्षण विभागाचे दुर्लक्ष….

( मावळप्रतिनिधी :संदीप मोरे )
लोणावळा : कोरोना महामारीच्या काळात लोणावळा शहरातील इंग्रजी माध्यमातील काही खाजगी शाळा पालकांकडून जबरदस्तीने शुल्क वसुल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अद्याप शाळा सुरु नसतानाही काही इंग्रजी माध्यमातील शाळांकडून पालकांना वारंवार फोन करून शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. यावर शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.त्यासंदर्भात शहरातील काही पालकांकडून ” अष्ट दिशा ” प्रतिनिधींना तक्रार आली आहे.

कोविड 19 च्या काळात काम धंदे बंद झाल्यामुळे सर्वच जनतेचे आर्थिक गणित बिघडले आहे. आज लॉकडाऊन जरी नसले तरी अजूनही येथील रिक्षा, टॅक्सी, तसेच रोजंदारी धंदे अद्याप पूर्वस्तरावर आलेले नाहीत. तसेच रेल्वे प्रवास सुरु नसल्यामुळे शहराबाहेर नोकरी करणारा नोकरवर्गही अद्याप घरीच बसून आहे, तर काही आपल्या वाहनांवरून शहराबाहेर कामाला जात आहेत. ज्यांना अजूनही कामधंदे नाहीत अशा नागरिकांचे खाण्या पिण्याचे हाल सुरु आहेत.

अशा परिस्थिती मध्ये ह्यांच्याकडून सध्या शाळांचे शुल्क जबरदस्तीने वसुल करणे म्हणजे त्यांच्या मानसिकतेला धक्का लावणेच आहे. ह्यामुळे पालक व विध्यार्थी ह्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. वारंवार शाळेतून शुल्क भरण्यासाठी तगादा लावल्यामुळे काही पालकांनी आपली दुचाकी तारण ठेऊन शुल्क भरले आहे तर काहींनी सोने तारण ठेऊन शुल्क भरल्याचा प्रकार समोर आला आहे. कोविड 19 च्या काळात इंग्रजी माध्यमातील खाजगी शिक्षण संस्थानी सक्तीने शुल्क वसुल करू नये, ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे अशा पालकांना शुल्क भरण्यासाठी वेळ द्यावा असे आदेश शासनाने दिले आहेत.
मात्र शासनाच्या ह्या आदेशाला काही इंग्रजी खाजगी शाळांकडून केराची टोपली दाखवत पालकांकडून सक्तीने शुल्क वसुली सुरु केली आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्याचा ऑनलाईन अभ्यास घेणार नाही, त्याला ऑनलाईन परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारे पालकांना फोन करून शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. विशेष म्हणजे चालू वर्षाचे शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. संदर्भात शाळा व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता खाजगी शाळांना इमारत भाडे,शिक्षक वेतन, कर्मचाऱ्यांचे पगार, व लाईट बिल असे विविध खर्च असतात असे सांगण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने मागील वर्षाचे थकलेले शैक्षणिक शुल्क वसुल करणे ठीक आहे परंतु ह्या वर्षी अद्याप शाळा सुरुच झाल्या नाहीत. तरीही शाळांकडून चालू वर्षाचे शुल्क वसुल करण्यासाठी पालकांवर सक्ती केली जात आहे. ह्या संदर्भात ” अष्ट दिशाचे ” संपादक यांनी लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांना सर्व प्रकार सांगितला असता. ज्या पालकांची परिस्थिती हलाखीची आहे, सध्या शालेय शुल्क भरण्याच्या स्थितीत नाही अशा पालकांवर इंग्रजी माध्यमातील खाजगी संस्थांकडून शुल्क भरण्यासाठी सक्ती केल्यास कारवाई केली जाईल असे आवाहन श्रीधर पुजारी यांनी केले आहे.
तरी शिक्षण विभागाने याबाबत सखोल चौकशी करून संबंधित खाजगी शाळांवर कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.याबाबतीत लोणावळा शहरातील भोंडे हायस्कुल व व्ही. पी. एस. हायस्कुल चे पालकवर्गाकडून कौतुक केले जात आहे. ह्या शाळांनी अद्याप पालकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही असे पालकवर्गाकडून आभार व्यक्त केले जात आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page