Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयाचे डॉ.अमित लंगोटे यांचा नवा अविष्कार !

खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयाचे डॉ.अमित लंगोटे यांचा नवा अविष्कार !

कर्जतच्या धनराज मेंढरे या युवा तरूणावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )रूग्ण आणि किडनीदाता या दोघांचेही रक्तगट वेगळे असतानाही ” किडनी प्रत्यारोपण ” करण्याची शस्त्रक्रिया खारघर येथील मेडिकव्हर रूग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे. एका १७ वर्षांच्या मुलाला त्याच्या आईने रक्तगट जुळत नसतानाही आपली किडनी दान करून मुलाला पुर्नजन्म दिले आहे . यामुळे रूग्णाला जीवदान मिळाले असून रक्तगट जुळत नसतानाही शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान डॉ.अमित लंगोटे आणि त्यांच्या टीमने यशस्वी पार पाडले असून वैद्यकीय क्षेत्रात एक नवा अविष्कार घडविला आहे.

लहान वयातच वडिलांचे छत्र हरविलेला कर्जत नगर परिषद हद्दीतील म्हाडा कॉलनी येथे रहाणारा धनराज राहुल मेंढरे , वय – १७ हा मुलगा किडनी आजाराने त्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे तो ७ ते ८ महिने डायलिसिसवर होता. या मुलाचे वडील नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होती. मात्र मुलाला माझेही आयुष्य लाभावे , अशी मनोमनी ईश्वर चरणी प्रार्थना करणारी त्याची आई रचना मेंढरे यांनी धीर सोडला नव्हता . जग जरी खूप मोठे असले , आणि या जगात वावरणारे मनुष्य जरी अनंत असले तरी आपल्या मुलाच्या उपयोगी कोण पडणार , आपल्या मुलाला कोण एक किडनी देणार ? या ना – ना शंकेने जिवंतपणीच मरण यातना भोगाणा-या त्या मातेला खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयाचे डॉ. अमित लंगोटे यांनी आशेचा किरण दाखविला . धनराज ची आई रचना यांनी आपली एक किडनी दिली तर धनराज ठिक होऊ शकतो , हे सांगितल्यावर ” मुलासाठी काहीही ” हि उमेद घेऊन रक्तगट वेगळा असतानाही आईने किडनी दान केल्यानं धनराजला नवीन आयुष्य मिळाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अमित लंगोटे यांनी नवा अविष्कार घडविला आहे .मेडिकव्हर रूग्णालयातील किडनीविकार तज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे यांनी वेगवेगळ्या रक्तगटाच्या किडनी प्रत्यारोपण करण्याचे आवाहन स्वीकारले. रूग्ण व मूत्रपिंडदाता या दोघांचे रक्तगट वेगळे असतानाही ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.
यावेळी डॉ. अमित लंगोटे म्हणाले की, जेव्हा धनराज आमच्याकडे आला तेव्हा , बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचा श्वास न श्वास देखील कमी झाला होता. प्राथमिक स्थितीत त्याला किडनीचा आजार असल्याचं लक्षात आले. किडनीमध्ये जी घाण असते ती डोक्यात पोहचून त्याची प्रकृती कोणत्याही क्षणी गंभीर झाली असती. मुलाला फिट्स सुद्धा येऊ शकल्या असत्या. अशा स्थितीत त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करून वैदयकीय चाचण्या करणं गरजेचं होतं. त्यानुसार वैद्यकीय अहवालात किडनीचं क्रिएटिन पातळी खूप जास्त असल्याचं लक्षात आलं. कॅल्शियमचं प्रमाणही खूपच कमी होतं. अशा स्थितीत मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचं निदान झालं. अशावेळी तातडीने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कुटुंबियांचे समुपदेशन केल्यानंतर आईने किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली.
परंतु , आईचं रक्तगट बी पॉझिटिव्ह होत तर धनराजचे रक्तगट ए पॉझिटिव्ह होत. किडनी प्रत्यारोपणासाठी रक्तगट एकसमान असणं गरजेचं असतं. मात्र रक्तगट वेगळे असतानाही हे किडनी प्रत्यारोपण करण्याचे आवाहन यशस्वीरित्या पार पाडले. आता शस्त्रक्रिया करून दोन महिन्यानंतर धनराज व त्याची आई रचना यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. धनराज आता पूर्वीप्रमाणे आपली दैनंदिन कामं करू लागला असून बारावीच्या परीक्षेसाठी बाहेरून बसणार असल्याचे त्याने सांगितले . डॉ. अमित यांनी कर्जतमधील हे तिसरे किडनी प्रत्यारोपण केले आहे. मागील दीड वर्षांपासून त्यांनी डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. किडनी प्रत्यारोपण करण्यास ७ लाख खर्च जरी येत असला तरी मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर ट्रस्ट यासाठी मदत करतात , म्हणून उपचार पद्धतीसाठी उशीर करू नये , तर वयाच्या ४० नंतर शरीराची तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून किडनी दान केल्यास दुसऱ्याला तुम्ही जीवनदान देऊ शकता , असे सांगितले.

धनराजच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाला किडनीचा आजार असल्याचं निदान झाल्याने आम्ही खूप घाबरलो होतो. डॉक्टरांनी आम्हाला प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. पण शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पैसे नसल्याने डॉक्टरांनी आणि रूग्णालयाने आम्हाला सहकार्य केले. मुलाला जीवनदान देण्यासाठी मी किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु रक्तगट वेगळे असल्याने शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. मात्र, अशा स्थितीत डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले आहे. माझ्या मुलाला नवीन आयुष्य दिल्याबद्दल मी डॉ. अमित लंगोटे व त्यांच्या टिम ची आभारी आहे . ” मला त्यांच्या रूपाने जणू काही देवच भेटला ” , असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page