Sunday, December 8, 2024
Homeक्राईमखालापुरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या गाडीतच तरुणाचा मृतदेह...

खालापुरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या गाडीतच तरुणाचा मृतदेह…

खालापुरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या गाडीतच तरुणाचा मृतदेह,होराळे येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात की घातपात ? अनेक तर्क वितर्काच्या जाळ्यात पोलीस तपास सुरू..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापूर तालुक्यातील होराळे या गावातील पंकज दळवी वय वर्षे २५ याचा काल रात्री एका स्कार्पिओ गाडीत मृतदेह आढळून आला.आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेलेल्या पंकजचा मृत्यू आणि तोही तो फिरायला गेलेल्या गाडीत झाल्याने अनेकांना घटनेनी धक्काच बसला होता.दारू पिऊन भांडण झाले की अन्य कोणत्या कारणास्तव मारामारी होऊन पंकजचा मृत्यू झाला असावा का?याबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

मात्र त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सध्या तरी पंकज हा गाडीतील मागच्या सिटवर दारू पिऊन झोपला होता.रस्त्यात असलेल्या स्पिडब्रेकरवरून गाडी उडाली आणि पंकजचा झोपेत हात गाडीच्या हँडलवर पडला त्यामुळे गाडीचे दार उघडले व पंकज रस्त्यावर पडला.हे चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने गाडी थांबवून पंकजला गाडीतील मधल्या सिटवर आडवे झोपवले आणि घराकडे गाडी घेऊन निघाला रस्त्यात गाडीतील डिझेल संपल्यावर गाडी बंद पडली.पुढे सकाळपर्यंत पंकज गाडीतच झोपला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे मात्र पंकजचे डोके मागील बाजूकडून फुटले होते.अति रक्तस्त्राव झाल्याने पंकजचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी हा अपघात आहे की घातपात हे अद्याप सिध्द झालेले नसल्याने या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची उत्सुकता त्याच्या नातेवाईकांना लागली आहे.

सदरची घटना वावोशी पोलिसांना कळतात कर्तव्यावर हजर असलेले वावोशी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जे.पी.म्हात्रे यांनी आपले सहकारी ए.एस.आय.सुर्वे,पो.ना.सहाने,शिंदे यांच्या कानावर घटनेची माहिती देत स्वतः घटनास्थळी रवाना झाले. घटनेची खातरजमा करून खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ.रंजित पाटील यांना सांगण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अंबिका अंधारे यांनी आपल्या वरिष्ठांना घटनास्थळी बोलावून घटनेतील तपासाबाबत सहकार्य घेतले.सदर घटनेची माहिती स्कार्पिओ मालक अर्जुन याने दिली. त्यांनी असे सांगितले की, मला सकाळी ६ वाजण्याच्या दर्म्यान एक फोन आला आणि आपली गाडी डिझेल संपल्यामुळे रानसई येथे रस्त्यावर बंद पडली आहे.

मी तात्काळ तेथे गेलो असता तेथे हे चार जण उभे होते व पंकज गाडीच्या मधल्या सिटवर उताणी झोपला होता.मला संशय आल्याने पंकजला निरखून पाहिले असता पंकज मृत झाल्याचा संशय आला मी त्यातील गाडी चालक यास सोबत घेऊन तात्काळ वावोशी पोलीस ठाणे गाठले व वरिल सर्व हकीगत पोलीस हवालदार यांना सांगितली.पोलीस जेंव्हा घटनास्थळी पोहचले तेंव्हा त्यांना घटनास्थळी एक पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी उभी होती.या गाडीत मधल्या सिटवर पंकज उताणी पडलेल्या अवस्थेत होता.त्याचा श्वास बंद होता.

त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव झाला होता.त्याच्या अंगात शर्ट नव्हता.मग गाडीच्या आसपास पाहिले असता एक रक्ताने भरलेला पांढरा रूमाल व गवतामध्ये पंकजचे शर्ट रक्ताने माखलेले दिसून आले.मात्र पंकज सोबत असणाऱ्या मित्रांना गाडीमालक गाडीजवळ पोहचे पर्यंत पंकजचा मृत्यू झाला आहे याची कल्पनाच नव्हती.त्यांना वाटत होते पंकज झोपला आहे. यावरून हे सर्वजण किती दारू प्यायले होते हे दिसून येते.


प्राथमिक अंदाजात जरी पंकज याचा मृत्यू हा पडल्यामुळे झाला असला तरी याबाबत पोलीस तपास वेगवेगळ्या पध्दतीने आणि संशयाने सुरू झाला असून पंकज याच्या जवळ खूप पैसे होते असेही त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पंकजचा अपघात की घातपात झाला आहे याचा तपास करावा असे मत पंकजच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्ह्या दाखल झाला नव्हता.मात्र पोलीस या तपासाच्या मागे असल्याने याबाबत लवकरच खरी माहिती पुढे येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page