Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूरात 'कृषी संजीवनी सप्ताहा' अंतर्गत शेतकरी सभा व प्रात्यक्षिक संपन्न.

खालापूरात ‘कृषी संजीवनी सप्ताहा’ अंतर्गत शेतकरी सभा व प्रात्यक्षिक संपन्न.

खोपोली- दत्तात्रय शेडगे
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2021 मध्ये नवनवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणे करिता दिनांक 21 जून ते 01 जुलै 2021 या कालावधीमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ – नारनवर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भात लागवडीच्या विविध पद्धती, भात रोपवाटिका व्यवस्थापन, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी सालके यांनी उपस्थितांना मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीच्या विविध संधी याबाबत माहिती दिली.

यावेळी होनाड ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश पाटील यांचे भात प्रक्षेत्रावर महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास मंडळाचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद ढोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाबाबत विस्तृत माहिती देऊन शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेऊन कृषी अवजारांचा वापर करण्याचे आवाहन केले.

यावेळी किर्लोस्कर कंपनीच्या प्रतिनिधींनी पॉवर टिलर द्वारे जमिनीची मशागत व भात शेतामध्ये चिखलणी चे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवले.यावेळी फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थ्यांना कलमांचे वाटप तसेच शेतकऱ्यांना बांधावर लागवडीकरिता तूर बियाण्याचे वाटप करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page