Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर...

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर…

प्रतिनिधी:(दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली.हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला.

अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त्या खवले मांजराजवळ कोणाला जाऊ न देता त्यावर पाळत ठेवली होती.अभिजीत घरत आणि खालापूर तालुका वनखात्याचे कर्मचारी तेथे दाखल झाले व त्यांनी त्या खवले मांजराची संपूर्ण शारीरिक तपासणी केली असता त्याच्या अंगाला लागलेला चिखल आणि मातीत माखलेली नखे यावरून ते वाट चुकून शिकारीच्या शोधात त्याठिकाणी आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्याला कोणतीही जखम झाली नव्हती याची खात्री करून त्यांनी त्याला सुरक्षित पिंजर्‍यात बंद केले आणि वनखात्याच्या नियमाप्रमाणे पंचनामा करून ताब्यात घेतले.खवले मांजर हे फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी असून आशिया व आफ्रिका खंडात सापडतो.

हे प्राणी शक्यतो पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतात. खवले मांजर निशाचर असून त्यांचा आहार प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी हा आहे. सहसा हा प्राणी एकटा राहतो आणि केवळ प्रजननासाठी नर मादी भेटतात असे सांगत हल्ली खवले मांजराची मांसासाठी शिकार केली जात असल्याचे सांगत, सुरक्षीत वन क्षेत्र कमी झाल्याने ते मानवी वस्तीत आढळल्याची माहिती अभिजित यांनी दिली.

खवले मांजर या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. सद्यस्तिथीत त्यांची नोंद IUCN रेड लिस्टच्या अंतर्गत येणारी “धोका असलेली प्रजाती” (Threatened species ) आहे. तिसऱ्या हाळमधील जागरुक नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दुर्मिळ प्रजातीला वाचवल्या बद्दल खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार आणि आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामजिक संस्थेने सर्वांचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page