खोपोली: लायन्स क्लब ऑफ खोपोली, मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या समर्पण हेल्थ केअर सेंटर व खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी खोपोली मुस्लिम कम्युनिटी हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 75 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
खोपोलीकर नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रगण्य असतात. कोणत्याही रुग्णांना रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून खोपोलीतील रक्तदाते मनुष्यधर्म निभावत असतात याची अनुभूती या तीनही सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पाहावयास मिळाली.
खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. आजच्या शिबिरात युवावर्गाने प्रकर्षाने सहभाग घेतला होता. महिला रक्तदात्यांची संख्यादेखील लक्षणीय होती.
लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन दिपेंद्रसिंग बदोरिया, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अबू जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांच्यासह तीनही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अतिक खोत, निजामुद्दीन जळगावकर, अल्पेश शहा यांसारख्या अनुभवी आयोजकांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.