Wednesday, September 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगणेशोत्सवच्या दिवशी किरण आणि स्नेहलवर आलेलं संकट टळलं.

गणेशोत्सवच्या दिवशी किरण आणि स्नेहलवर आलेलं संकट टळलं.

अपघात ग्रस्तांच्या टीम सोबत इतर विघ्नहर्ते आले धावून..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
दिनांक 10 सप्टेंबर 2021
गणेशोत्सवाची धूमधाम सुरू होती सर्वजण गणेश पूजेमध्ये रममाण झाले होते. सायंकाळच्या आरतीची वेळ होती. त्याचवेळी खोपोली पोलिस स्टेशन मधून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांना फोन आला की, खोपोलीच्या जवळ असलेल्या नाथ बाबांच्या गुहेच्या दरम्यान डोंगरातल्या जंगलात एक युवती आणि युवक ट्रेकर वाट चुकले असून, त्याना आपली मदत हवी आहे.

गणेशोत्सवाचा अर्थात आनंदाचा दिवस असताना कुणालाही डिस्टर्ब करू नये म्हणून, अपघातच्या ग्रुपवर मेसेज न टाकता, गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, हनीफ कर्जीकर, भक्ती साठेलकर, शुभम कंगळे, फरहान कर्जीकर यांना घेऊन शोध मोहीम सुरु करायचे ठरले. सगळे खोपोली पोलीस ठाण्यात जमले देखील.

अपघातच्या टीमचे सदस्य तथा खंडाळा घाट आणि परिसराची इत्यंभूत माहिती असलेल्या योगेश शिंदे यांची या कामी मदत घ्यायचं पक्क झालं. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि पोलीस कर्मचारी यांनी त्या सर्वांना या घटनेची माहिती दिली. त्यासोबत जे ट्रेकर हरवले होते त्यांचा संपर्क नंबर दिला. किरण नावाच्या त्या ट्रेकर सोबत गुरुनाथ साठेलकर यांनी संपर्क साधला. त्याला आपली टीम मदतीला येणार असल्याची कल्पना दिली, कोणत्याही परिस्थितीत तू लोकेशन सोडू नको असं सांगत त्याचं मनोधैर्य वाढवलं. त्याच्याकडून तो कोणत्या दिशेला गेले याची माहिती घेतली. त्यासोबत तो कुठे अडकला आहे लोकेशन टाकायची सूचना केली, त्याप्रमाणे त्याने लोकेशन शेअर केलं.

सुरुवातीला त्याने जेथून त्या दोघांनी ट्रेकिंगला सुरुवात केली होती, त्या झेनिथ वॉटर फॉल शेजारच्या दत्त मंदिराकडून शोध मोहीम सुरू करण्याची तयारी केली. ते सर्वजण तेथे पोहोचले पण जेंव्हा प्रत्यक्ष लोकेशनचा अंदाज घेतला असता तेथून जाणे खूप लांबचे होते. योगेश शिंदे यांनी खोपोलीतल्या साईबाबा नगर येथून दुसरी वाट शोधून त्यांच्यापर्यंत पोचण्याचे प्लॅनिंग केले. तेथेच नारायण नावाची स्थानिक व्यक्ती भेटली. त्याने सांगितले की काही मुलं त्या हरवलेल्या ट्रेकच्या शोधार्थ गेली असून, त्यांना अजूनही काही यश आले नाही. त्या सर्वाना एकमेकाचे नंबर देऊन साईबाबा नगर येथून शोधार्थ जायची तयारी केली.

साईबाबा नगर येथील युवकांनी या ठिकाणाहून वर जाणे खूप अडचणीचे आहे, तुम्ही तेथून जाऊ शकणार नाही कारण वाट अवघड आहे असे सांगितले. परंतु जे अशक्य असतं तेथूनच सुरुवात करणाऱ्या अपघातच्या टीमचे मेंबर डोक्यावर पाऊस आणि अंधार सोबतीला घेऊन आपल्या टार्गेटकडे निघाले. चढ-उतार, कोसळणारे धबधबे, आड येणारी झुडपं आणि काट्याकुट्यातून वाट काढत लोकेशन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता.

त्यांनी तीन टप्प्यांमध्ये टीमचे डिव्हिजन झाले योगेश शिंदे आणि विजय भोसले हे पहिल्या टप्प्यावर, दुसऱ्या टप्प्यावर गुरुनाथ साठेलकर, भक्ती साठेलकर, शुभम कंगळे आणि फरहान कर्जीकर तर तिसऱ्या टप्प्यावर अमोल कदम आणि हनीफ कर्जीकर यांनी पुढे पुढे जाण्यास सुरुवात केली. साधारणता तासाभराच्या पायपिटीनंतर हरवलेले ट्रेकर आणि अपघातची टीम एकमेकाच्या अगदी जवळ आली हे गुगल मॅप वरून लक्षात आले. टॉर्च आणि हाकेने एकमेकाचा संपर्क सुरू झाला. योगायोगाने त्याच वेळी शोधार्थ निघालेले झेनिथ ठाकूर वाडीच्या टीमचे मेंबर्स अक्षय जाधव, आदित्य उघडे, संकेत जाधव, सचिन भगत, हेमंत उघडे, कृणाल जाधव, लोकेश जाधव हे देखील त्या ठिकाणी पोचली होती. वाट हरवलेले दोन्ही ट्रेकर्स किरण आणि स्नेहल हे सगळ्यांना दिसले.

अनोळख्या जागी आणि अनामिक संकटात आपल्या मदतीला कोणी येईल की नाही ? या शंकेने ग्रासलेले हे दोघेजण आनंदित झाले. ते सर्वजण आता उताराच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी चालू लागले. डोंगर चढताना जेवढी अडचण येत होती तेवढीच उतरताना देखील येत होती, मात्र आता त्यामध्ये भय नव्हते.

त्या ट्रेकर्सचे सामान आपल्या खांद्यावर घेऊन उतरताना एक वेगळा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. साईबाबा नगर मध्ये पोचल्या नंतर, काही वेळापूर्वी अंधाऱ्या वाटेने वर जाऊ नका, असा सल्ला देणारे युवक आता आश्चर्यचकित होऊन या घटनेकडे पाहत होते. तोवर खोपोली पोलीस स्टेशनला खबर दिली गेली होती, सर्वांच्या स्वागताला खोपोली पोलीस स्टेशनच्या वाहनाचा ताफा आला होता.

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यावर स्वतः पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि इतर कर्मचारी वर्ग टीमच्या स्वागताला हजर होता. त्या ठिकाणी अटीतटीचा प्रसंग आला तर जय्यत तयारीत आलेली यशवंती हायकर्सची टीम भंडारी सर आणि पद्माकर गायकवाड यांच्या मार्गदशना खाली सज्ज होती . पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी किरण आणि स्नेहलची विचारपूस केली, त्यांना धीर दिला, त्यासोबत त्यांचे अनुभव देखील विचारले आणि यशस्वी रेस्क्यू टीमचे कौतुक केले.

संकटाचं एक पर्व संपलं होतं, मात्र आता पुढे काय ? हा विचार किरण आणि स्नेहलच्या मनात उभा राहिला होता. कारण खूप रात्र झाली होती. त्यामुळे दोघांना आपापल्या घरी जाण्याचं कोणतेच साधन नव्हतं. त्यात स्नेहलचे शूज देखील हरवले होते आणि दोघांचे कपडेही चिंब भिजले होते. अडचण ओळखुन त हनीफ कर्जीकर यांनी आपल्या मित्राचे दुकानातून त्या दोघांच्या ड्रेसचा बंदोबस्त केला. रात्री मुक्कामाची अडचण लक्षात घेऊन गुरुनाथ साठेलकर यांच्या घरी दोन्ही जणांची व्यवस्था करण्यास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले.

ते दोघेही साठेलकर यांच्या घरी राहिले, पाहुणचार घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या घरी निघून गेले.

सर्वत्र विघ्नहर्त्याचा आगमन झालेले असताना, किरण आणि स्नेहलच्या समोर उभे ठाकलेलं विघ्न ज्या लोकांच्या माध्यमातून दूर झालं, त्यांना त्या बाप्पानेच सुबुद्धी दिली नसेल कशावरून ? त्यांच्या अंगी मदतीला जाण्याचा बळही बाप्पानेच दिले असेल.

स्वतःच्या घरात गणपतीचा उत्सव असून देखील मदतीला येणाऱ्या या सर्व जणांना अवलियाच म्हणावे लागेल.

“रात्रंदिवस आम्हा मदतीची ओढ” असा ध्यास घेतलेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या नावे हा एक वेगळा उपक्रम नोंदवला गेला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page