कर्जत ( सुभाष सोनावणे )गोर गरीब – कष्टकरी – श्रमिक – दलित – आदिवासी समाजासाठी सदैव लढणारे व कामगार संघटनेचा बुलंद आवाज भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ .मनोहर दळवी यांचे आज अपघाती दुःखद निधन झाले. कामगार विश्वात एकेकाळी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कंपनी व्यवस्थापन व निष्ठुर मालकांविरोधात सडेतोड बोलून बंड करणारा कामगारांचा तारणहार काळाच्या पडद्याआड गेल्याने गुंडगे परिसराबरोबरच कामगार विश्वात शोककळा पसरली.खोपोली येथे पेपको कंपनीत कामावर असणारे कामगार ते कामगार नेते अशी त्यांची ओळख बरोबरच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते जेष्ठ नेते होते .
पेपको कंपनी बंद पडल्यावर कंपनीच्या मुजोर व्यवस्थापनाच्या विरोधात त्यांनी जवळजवळ २९ वर्षे कामागारांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा दिला.मात्र लाल फितीत अडकलेले कामगारांच्या आयुष्याची पुंजी ५०० कामगारांना आजवर मिळाली नसल्याने पेपको कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून कामगार न्यायालय ते मा . उच्च न्यायालय तसेच मा. राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत त्यांनी लढा दिला.कर्जत तालुक्यातील त्यांनी आदिवासी – श्रमिक – गोरगरीब – दलित जनतेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने , मोर्चे , उपोषण करून न्याय देण्याचा प्रयत्न केला . पेपको कंपनी बंद झाल्यावर अनेक वर्षे त्यांनी रिक्षा चालवून आपले कुटुंब सांभाळले .कर्जत रेल्वे तीन आसनी रिक्षा चालक – मालक संघटनेचे ते सल्लागार होते.
अत्यंत मेहनती , शांत स्वभावाचे ते असल्याने कर्जत तालुक्यात सर्वांच्या परिचयाचे होते. शासकीय कार्यालयात त्यांच्या कार्याचा दबदबा होता .रायगड जिल्ह्या बरोबरच कर्जत तालुक्यातील त्याकाळी डॅशिंग नेतृत्व असलेले कॉ .नाना ओव्हाळ , गोपीनाथ ओव्हाळ , माधव मोकाशी , जे.के.पिरकड , दशरथ जाधव ,महामुनकर , देशमुख मामा , ऍड.गोपाळ शेळके यांच्या बरोबर त्यांनी काम केले होते.कर्जत नगर परिषद हद्दीत विश्वनगर येथे ते रहात होते.
तेथे त्यांची आंब्याची बाग होती . आज सकाळी ते आंबे काढण्यास झाडावर चढले असता तोल जाऊन ते खाली पडले , त्यांना दवाखान्यात नेले असता या जबरी अपघातातून ते सावरू शकले नाहीत , व त्यांचे अपघाती दुःखद निधन झाले . त्यामुळे तालुक्या बरोबरच गुंडगे , विश्वनगर परिसरात शोककळा पसरली आहे . अनेकांनी त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली .