Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडचारफाटा ते भिसेगाव रेल्वे गेट रस्त्याची दुरावस्था , ठेकेदाराला अधिका-यांचे अभय ,...

चारफाटा ते भिसेगाव रेल्वे गेट रस्त्याची दुरावस्था , ठेकेदाराला अधिका-यांचे अभय , अमोघ कुलकर्णी यांचा उपोषणाचा ईशारा !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कर्जत चारफाटा ते श्रद्धा हॉटेल रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे. राष्ट्रीय महामार्ग ७६ अन्वये कर्जत ते डोणे या रस्त्यांच्या अंतर्गत शासनाने हायब्रीड अँन्यूटी या योजने मार्फत हे काम चालू आहे.एकूण ५२ करोड रुपयांचे हे काम असून त्यानुसार हे काम भिसेगाव गेट श्रद्धा हॉटेल येथपर्यंत कामाची नोंद असताना श्री.खारपाटील ( पनवेल ) या ठेकेदाराने चारफाटा ते डोणे हे काम पूर्ण केले आहे,मात्र उर्वरीत काम अर्धवट अवस्थेत ठेकेदाराने ठेवले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.खारपाटील या ठेकेदारावर कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीत की ” ब्र ” शब्द देखील काढत नसल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

यावरून मार्ग काढताना वाहन चालक व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे , यामुळे नागरिकांत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप पसरला आहे.याविरोधात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संघटनेचे कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी यांनी दंड थोपटले असून रस्ता १५ दिवसात न सुधारल्यास अथवा काम चालू न केल्यास उपोषणाचा ईशारा दिला आहे.


चारफाटा ते भिसेगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत खराब झाले आहे . ४७० मीटर काम बाकी असून उर्वरित काम ठेकेदाराने पूर्ण केले आहे.हे काम मागील एक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे.या मार्गावरून रेल्वे कामगार,तसेच एस टी बस,वाहन धारक,पंचक्रोशीतील नागरिक जात असतात,त्यांना प्रवास करताना अनंत यातना होतात.

अनेकांना आजाराला सामोरे जावे लागते,तर अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांत अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा संताप पसरला असताना या रस्त्यासाठी अनेक पक्ष संघटनांनी आंदोलने केली आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत आहेत,तर ठेकेदार देखील कुणालाही जुमानत नाही.

माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संघटनेचे कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेतली असता सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत नगर परिषदेकडे वर्ग करणार असल्याचे कारस्थान चालले असल्याचे उघड झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारावर पांघरून का घालत आहेत ? कुणाचा राजकीय दबाव आहे का,की ठेकेदाराला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे,असा सवाल अमोघ कुलकर्णी यांनी उपस्थित केला असून याविरोधात १५ दिवसांत काम चालू झाले नाही तर आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागात याबाबतीत तक्रार निवेदन देताना माहिती अधिकार संघटनेचे कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी , सुनील गोगटे , भिसेगाव ग्रामस्थ रवि भोईर , भिसेगाव पोलीस पाटील संजय हजारे आदी उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page