Sunday, April 21, 2024
Homeपुणेमावळजलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत अभियानासाठी जिल्ह्यातील 187 गावांचा समावेश…

जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत अभियानासाठी जिल्ह्यातील 187 गावांचा समावेश…

मावळ (प्रतिनिधी): शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.
या अभियानांतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामात शासकीय यंत्रणेने लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच अशासकीय तसेच खासगी संस्थांचाही योग्य सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत गाव निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांच्या समवेत जलयुक्त शिवार अभियान 2.0 जिल्हास्तरीय समितीतील सदस्य उपस्थित होते. सर्व उप विभागीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे तयार करावा. अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी करून पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा. हे अभियान जिल्ह्यात मोहीम स्तरावर राबवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
या अभियानासाठी हवेली तालुक्यातील 17 गावे, शिरूरमधील 17 गावे, खेडमधील 30 गावे, मावळातील 13 गावे, जुन्नरमधील 12 गावे, आंबेगावमधील 13 गावे, पुरंदरमधील 14 गावे, वेल्ह्यातील चार गावे, मुळशी आणि भोरमधील प्रत्येकी सहा गावे, बारामती मधील 39 गावे, इंदापूरातील 11 गावे आणि दौंड तालुक्यातील 15 गावांचा समावेश आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page