Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडजांबरुग गावातील डोंगर क्षेत्राची खालापूर तहसीलदारांकडून पाहणी ,ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना !

जांबरुग गावातील डोंगर क्षेत्राची खालापूर तहसीलदारांकडून पाहणी ,ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना !

खालापूर : खालापूर तालुक्यातील जांबरूग गावात अतिवृष्टी सारखा संभाव्य प्रकार घडल्यास उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्याचे तहसीलदार अयुब तांबोळी, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि महसूल तसेच आपत्कालीन कृती दलाचे अधिकारी गुरुनाथ साठेलकर यांनी प्रत्यक्ष डोंगर भागाची पाहणी केली.

जांबरुग गावात मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेजारच्या डोंगरावरून काही मोठे दगड घसरून खाली आले होते . सुदैवाने त्या घटनेत जिवीतहानी झाली नव्हती . त्या पार्श्वभूमीवर यंदा असा संभाव्य प्रकार झाल्यास उपाय योजनांचा आढावा तसेच गावकऱ्यांनी दक्ष रहावे या संबंधीची चर्चा करणे करिता रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाची पाहणी करण्यात आली व गावकऱ्यांशी संवाद साधला . मागच्या वर्षी अतिवृष्टीत काही मोठ्या आकाराचे दगड डोंगरावरून खाली आले होते.

त्याची पुनरावृत्ती होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन , तहसीलदार आयुब तांबोळी , पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांनी गावकऱ्यांसमवेत डोंगरमाथ्या पर्यंत जाऊन धोकादायक क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली . आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले . त्यानंतर गावातील समाज कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले . त्यानंतर गावातील समाज मंदिरात गावकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी घटना घडण्यापूर्वी आणि घडल्यानंतर काय करावे या संदर्भात सल्लामसलत करताना नागरिकांच्या मनातून दरड कोसळण्याची भीती काढण्याचा प्रयत्न केला.

तहसीलदार आयुब तांबोळी यांनी महसुल प्रशासन संपूर्णपणे दक्ष असल्याचे सांगत अतिवृष्टीच्या वेळी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच रात्री अपरात्री आणि दिवसाढवळ्या नागरिकांनी कसे सतर्क रहावे आणि आपल्या समाज बांधवांसाठी गावांतील युवक आणि युवतींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे या संबंधी सूचना केल्या . धोक्याची लक्षणे आढळताच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सुरक्षा यंत्रणांशी संपर्क करावा जेणेकरून घटनेची तीव्रता कमी होईल असे संवादातून स्पष्ट केले . या बैठकीला गावातील बहुतांश महिलांनी सहभाग घेतला होता.नागरी कृती दलाकडूनही गावकऱ्यांना मार्गदर्शन केले गेले.

आपत्कालीन प्रसंगी सतर्क होण्यासाठी महसूल प्रशासनाकडून धोक्याच्या कशा सूचना दिल्या जातील तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी नागरिकांशी कसा संवाद साधला जाईल याचे विश्लेषण केले . ग्रामपंचायत प्रशासनाला नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताला अडवणूक होणार नाही अशा पद्धतीने नाले साफसफाई करण्याचे निर्देश यावेळी दिले गेले.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतरित करावयाची विविध ठिकाणे व आरक्षित इमारतींची पाहणी देखील केली गेली . या क्षेत्रात बीड खुर्द गावाच्या हद्दीतील दरड कोसळण्याची शक्यता आहे त्या जागेची ही पाहणी यावेळी करण्यात आली.

- Advertisment -

You cannot copy content of this page