भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) क्रिकेट खेळात महिलांना वाव मिळण्यासाठी व भविष्यात इतर महिलांनी देखील जास्तीत जास्त भाग घ्यावा , व रायगड जिल्ह्याचे नाव क्रिकेट विश्वात मोठे व्हावे , हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्हा असोसिएशन तर्फे पुढाकार घेवून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि जिल्हा प्रशिक्षक व सिलेक्टर मनीषा अडबल यांनी रायगड जिल्हातील पंधरा वर्षा खालील मुलींची टीम आणि ओपन महिला च्या टीम मध्ये ” प्रदर्शनीय सामना ” खेळवण्यात आला . जागतिक महिला दिना निमित् खेळविण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जागतिक महिला दिना निमित् रिलायन्स फाउंडेशनच्या लोधिवली येथील मैदानावर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या वतीने पंधरा वर्षा खालील मुली आणि ओपन मधील मुली असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित केला होता . रायगड जिल्हातील एकूण पस्तीस मुलीनी या मध्ये भाग घेतला होता . या सामन्यांचे उद्घाटन शुभांगी भगत यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पावसकर , संदीप पाटील , सुहास हिरवे , आणि कोंडालकर अकादमीचे राजेंद्र कोंडालकर उपस्थित होते.
या प्रदर्शनीय सामन्यात मुलींनी अतिशय उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजीचे प्रदर्शन केले , आणि येणाऱ्या पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित सामन्यात रायगड जिल्ह्याचा ” डंका ‘ या मुली नक्की गाजवणार , असा विश्वास अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांनी व्यक्त केला आहे . पंधरा वर्षा खालील मुलींची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ची निमंत्रित स्पर्धा पुणे येथे १३ मार्च पासून तर ओपन च्या मुलींचे सामने पुणे येथेच २३ मार्च २०२४ पासून सुरू होणार आहेत.
सेलेक्टर आणि प्रशिक्षक मनीषा अडबल मॅडम यांनी गेल्या तीन ते चार वर्षा पासून रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेट वाढीसाठी कोणतही मानधन न घेता खूप मोठे योगदान दिले आहे . त्यांनी अनेक मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आहे . त्यांच्या या रायगड क्रिकेटच्या योगदानामध्ये अध्यक्ष चंद्रकांत मते हे त्याना खूप सहकार्य करत आहेत , म्हणून आता रायगडच्या ” क्रिकेटर मुली ” महाराष्ट्रामध्ये चमकत आहेत.