तळेगाव (प्रतिनिधी):जुना मुंबई पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि.29 रोजी रात्री 12:30 च्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
जुन्या मुंबई पुणे महार्गावर तळेगाव दाभाडे इथे पायोनिअर हॉस्पिटलजवळ हा अपघात घडला असून याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पंढरी बाबळे (वय 26) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भा.द.वी. कलम 304(अ), 269, मो.वा.का.क.184,134 (अ), (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारीख, व वेळी आणि ठिकाणी एक अनोळखी पुरूष (वय अंदाजे 45 वर्षे) याला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. सदर अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने अविचाराने, भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने सदर अपघात घडला आणि त्यात गंभीर जखमी झालेल्या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच वाहन चालक या घटनेची माहिती न देता पळून गेला आहे, अशी माहिती फिर्यादीत आहे. तळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.