झेनिथ धबधब्यावर मोठी दुर्घटना तीन पर्यटक गेले वाहून – दोन मृतदेह सापडले एक लहान मुलगी बेपत्ता..

0
646

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
कोकनात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे, यामुळे खालापूर तालुक्यातील खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. या धबधब्यावर वर्षाविहारासाठी गेलेल्या काही पर्यटकांपैकी तीन पर्यटक प्रवाहासोबत वाहून गेले आहेत. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक लहान मुलगी बेपत्ता आहे. खोपोली पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या टिमने रात्री उशिरापर्यत बेपत्ता मुलीचा शोध घेतला.

मात्र अंधार व पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा येत असल्याने शोध मोहिम राबविण्यात आली असून उद्या बुधवारी सकाळी सहा वाजता मोहिम पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेने गुरुनाथ साठेलकर यांनी दिली.हवामान खात्याने 28 व 29 सप्टेंबर असे सलग दोन दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

सकाळपासून खोपोली व जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. खोपोली शहरानजीक असलेल्या प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर मंगळवारी दुपारी पर्यटनासाठी 15 पर्यटक गेले होते. यामध्ये पुरुष, महिला व लहान मुलांचा समावेश होता, अचानक पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पाण्याचा वेगही वाढला आहे.

या प्रवाहात तिघेजण वाहून गेले आहेत. यापैकी मेहरबानू खान, वय 40 वर्षे आणि रुबिना वेळेकर, 40 वर्षे (दोघीही राहणार खोपोली) यांचा मृत्यू झाला आहे. तर आलंमा खान ही 8 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.