Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडडिकसळ नाक्यावर पोलीस चौकी कधी होणार?

डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी कधी होणार?

भिवपुरी : कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन परिसरातील गावांमध्ये झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी करण्याची मागणी करण्यात येत होती. सदर मागणीला उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीने संमतीही दिली. मात्र, अंतर्गत राजकारणामुळे काम रखडल्याने चोऱ्या वाढल्यावर चौकी होणार का, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
भिवपुरी रोड रेल्वे स्थानक परिसरात मागील काही वर्षात कॉलेज, हॉस्पिटलसह व्यापारी संकुले यांच्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. या पार्श्वभूमीवर डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी होण्याबाबतची मागणी करण्यात येत होती. सदर प्रस्तावाला तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांनी मान्यताही दिली होती. तसेच, उमरोली ग्रामपंचायतीने बांधकामही सुरू केले होते. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे सदर काम रखडले आहे. दरम्यान भिवपुरी परिसरात चोऱ्या होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे.
कोरोना महामारीच्या काळात मोठ्याप्रमाणात रोजगार बंद असल्याने अनेकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे चोऱ्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी व्हावी अशी स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिक मागणी करीत आहेत. याबाबतचे पत्र सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड यांनी नुकतेच झालेल्या मासिक सभेत दिले आहे. यावेळी, जिवक गायकवाड, मनोहर ठाणगे उपस्थित होते. सदर पत्रक ग्रामपंचायतीच्यावतीने अमर ठाणगे, जयेश बोराडे यांनी निवेदन स्वीकारले.
प्रतिक्रिया
डिकसळ गावाच्या नाक्यावर मागील काही वर्षात दुकाने सुरु झाली आहेत. तसेच काही ठिकाणी चोऱ्याही झाल्या आहेत. त्यामुळे सदर दुकानदार आणि गावाच्या सुरक्षेसाठी डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी आवश्यक आहे.
सरिता गजानन शेळके, पोलीस पाटील-डिकसळ
- Advertisment -

You cannot copy content of this page