खोपोली- दत्तात्रय शेडगे
दिनांक 01/11/2020 सकाळी 7.00 वाजता प्रचिकेत भगवान काळे वय 32 पिंपरी चिंचवड, हा सह्यादीच्या पर्वत रांगेतील “ढाक भैरव” येथे ट्रेकर्ससाठी थ्रिलिंग समजल्या जाणाऱ्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी असलेल्या गुहेतून खाली उतरताना त्याचा हात सटकला आणि तो अंदाजे 200 फुट दरीत कोसळला.
दगड धोंड्यातून ठेचकळ कोसळलेल्या प्रचिकेतच्या शरिरावर जखमा झाल्या होत्या आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तरीही त्याचा श्वास सुरू आहे हे त्याच्या सोबतच्या इतर ट्रेकर्सनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जाणले आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्याच दरम्यान शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळाचे अनिकेत बोकील, आणि दिपक पवार हे जवळच्या “कळकराय” या शिखरावर क्लायबींगसाठी रेकी करत होते. त्यांना हे वृत्त समजताच ते प्रचिकेतच्या मदतीसाठी लगेचच स्पॉटवर गेले. त्यांना अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, शुभम आंद्रे, अविनाश केदारी यांची मदत मिळाली. मात्र तोपर्यंत नियतीने संधी साधली होती, दुर्दैवाने मदतीला धावलेल्याना प्रचिकेतची प्राणज्योत मालवली असल्याचे कळले. कामशेत पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची कल्पना दिली गेली.
अनिकेत व दिपकने ते प्रेत वर नेण्यासाठी तयारी करत असताना शिवदुर्गच्या अन्य मेम्बर्सना कॉल करून मदतीसाठी बोलावून घेतले. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, दगड धोंड्यातून आणि काट्या कुट्याच्या निसरड्या वाटेवरून, भयंकर कष्टाने प्रचिकेतचे शव वर आणले गेले.
अनिकेत बोकील, दिपक पवार, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अविनाश केदारी, चंद्रकांत बोंबले,रसिक काळे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, सतिष मेलगाडे, महेश मसने, गणेश गिद, विशाल मोरे, नेहा गिद, प्रियंका मोरे, नुतन पवार, ब्रिजेश ठाकुर , अनिकेत आंबेकर, ओंकार म्हाळसकर, गोपाळ भंडारी यांनी या ट्रेकिंग दरम्यानच्या झालेल्या अपघातात स्वतःचा जिव धोक्यात घालून मदत केल्याने त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
प्रचिकेत या होतकरू दुर्गप्रेमीची थोड्याश्या अनावधानाने ही मोहीम शेवटची ठरली, अशी खंत शिवदुर्गच्या सुनील गायकवाड यांनी व्यक्त करताना ट्रेकिंग करताना स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्या असे आवाहन ट्रेकर्सना केले.