Friday, July 26, 2024
Homeपुणेलोणावळातब्बल 21कोटींच्या फसवणूक प्रकरणी लोणावळ्यात तिघांना अटक तर दहा जणांवर गुन्हा दाखल...

तब्बल 21कोटींच्या फसवणूक प्रकरणी लोणावळ्यात तिघांना अटक तर दहा जणांवर गुन्हा दाखल…

लोणावळा दि.3: भिवंडी मीरा भाईंदर महापालिकेचे माजी आयुक्तांची 21 कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.


धनराज जवनमल भुरट ( वय 58, रा. महावीर पॅलेस सोसायटी लोणावळा, सध्या रा. सिद्धस्मृती सोसायटी, रेंन्जहील रोड, शिवाजी नगर, पुणे ), कांतीलाल जवनमल भुरट ( वय 59 ), भूषण कांतीलाल भुरट ( वय 32, रा. महावीर पॅलेस सोसायटी, गावठाण, लोणावळा ), या तिघांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यासह अनिता धनराज भुरट, गौरव धनराज भुरट, रजनी संपत पिचा, शारदा कुंदन रावळ, निरूपमा जयप्रकाश राव, श्रवण शर्मा, प्रज्ञा शर्मा इत्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लोणावळा नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी व भिवंडी मीरा भाईंदर महापालिकेचे माजी आयुक्त शिवमुर्ती सत्यपा नाईक ( वय 64, रा. चंद्रमा बिल्डिंग, राम मारुती रोड, ठाणे ) यांनी फिर्याद दिली आहे.


लोणावळा शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपींनी 1992 ते 2011 या कालावधीत नाईक यांचा व त्यांच्या मानस आई लक्ष्मीबाई विष्णुपंत ढोबळे यांचा विश्वास संपादन करत त्यांना स्थावर मिळकती खरेदी करण्याचे वचन देत त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम उकळत तब्बल 21 कोटींची फसवणूक केली आहे. श्रीमती ढोबळे यांच्या वृद्धापकाळाचा गैरफायदा घेत त्यांच्या मिळकतीचे बनावट दस्तऐवज परस्पर बक्षीसपत्र, मृत्यूपत्र तयार करत संपत्ती लाटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी धनराज भुरट, कांतीलाल भुरट, भूषण भुरट यांना अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता वडगाव न्यायालयाने त्यांना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page