Wednesday, October 16, 2024
Homeपुणेमावळतळेगाव, वडगाव, लोणावळा व कामशेत याठिकाणी 7 मे पासून असणार लॉकडाऊन...

तळेगाव, वडगाव, लोणावळा व कामशेत याठिकाणी 7 मे पासून असणार लॉकडाऊन…

मावळ दि.4: मावळ तालुक्यातील वाढती कोवीड रुग्णसंख्या लक्षात घेता उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती सभागृह मावळ येथे मा. उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी राजेंद्र जाधव (अतिरिक्त कार्यभार) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत तळेगाव, वडगाव, कामशेत,लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक 7 मे च्या पहाटे 1:00 वा. पासून ते 12 मे च्या मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.


सदर बैठकीस रावसाहेब चाटे प्रभारी तहसीलदार मावळ, सुधीर भागवत गट विकास अधिकारी पंचायत समिती मावळ,डॉ. चंद्रकांत लोहारे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती मावळ,डॉ. गुणेश बागडे मावळ तालुका कोवीड समन्वयक तसेच तळेगाव, लोणावळा नगरपालिका चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ,तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक , वडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बैठकीस उपस्थित होते.


मावळ तालुक्यातील ज्या नगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये covid 19 चा वेगाने प्रसार होत आहे तसेच सद्यस्थितीत त्याठिकाणी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे तेथील प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लोणावळा नगरपालिका क्षेत्र, वडगाव नगरपंचायत क्षेत्र, तळेगाव नगरपालिका क्षेत्र व कामशेत मध्ये दिनांक 07 मे (शुक्रवार)च्या पहाटे 1.00 पासून ते दिनांक 12 मे (बुधवार)च्या रात्री 12.00पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे .सदर काळात फक्त रुग्णालय सुविधा,औषधी दुकाने चालू असतील व सकाळी 07 ते 9 या कालावधीत दूधवितरण सेवा चालू राहतील. सदर लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी यांनी सदर कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणांना व पोलीस स्टेशन प्रमुख यांना याबाबतचे निर्देश दिलेले आहेत.


सर्व लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, समाजसेवी संघटना व नागरिकांनी देखील या काळात नियमांचे पालन करावे व यंत्रणेला सहकार्य करावे जेणेकरून सर्वांच्या सहकार्याने कोवीडचा वाढता प्रादुर्भाव आपल्याला रोखणे शक्य होईल .या बाबतचे आवाहन देखील माननीय उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page