
मावळ (प्रतिनिधी) : सुमारे पाच वर्षांपूर्वी कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताजे येथे एका व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी वडगाव न्यायालयात खटला चालू होता. त्याचा निकाल नुकताच लागला असून न्यायालयाने या गुन्ह्यासाठी तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
रघुनाथ चंदू वाल्हेकर (वय 55 वर्षे),कैलास उर्फ काळू रघुनाथ वाल्हेकर (वय 32 वर्षे ), विठ्ठल रघुनाथ वाल्हेकर (वय 30 वर्षे ) सर्व राहणार सावंतवाडी, महागांव ता. मावळ जि. पुणे अशी शिक्षा झालेल्यांची नवे आहेत.
तिन्ही आरोपीना दोषी धरून त्यांना भादवि कलम 302,34 मध्ये जन्मठेप व प्रत्येकी 5000 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद व भादवि कलम 201 मध्ये प्रत्येकी 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
दिनांक 10/12/2017 रोजी ताजे येथील रेल्वेमार्गाजवळ हरिच्छंद्र पांडुरंग वाघमारे यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. कामशेत पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी सदर गुन्हयाचा तपास हाती घेतला. व कामशेत पोलीस स्टाफच्या मदतीने या गुन्हयाचा कसोशीने तपास करून गुन्हा उडकीस आणला.
सहाय्यक फौजदार अजय दरेकर यांनी गुन्ह्याचा तपास केला. व कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे केस सोपविण्यात आली.कोर्ट अमलदार पोलीस हवालदार संदिप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे , जिल्हा पैरवी अधिकारी अर्जुन घोडे पाटील, पोलीस हवालदार मनोज लोखंडे यांनी केसमध्ये सुनावणी वेळी मदत केली. सरकारी वकील सुनील मोरे यांनी कोर्टात सरकारतर्फे बाजू मांडून आरोपींना शिक्षा होण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.