Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडतानाजी मालुसरे सिटी - शेलट्रेक्स कंपनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल...

तानाजी मालुसरे सिटी – शेलट्रेक्स कंपनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल…

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
प्रचंड गाजावाजा करत कर्जत तालुक्यातील मौजे शिरसे – आकुर्ले येथे सन २००८ साली तानाजी मालुसरे सिटी तयार होणार आहे यातील फ्लॅट सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असून लागलीच पैसे भरून बुकींग करा ,अशी जाहीरात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.झगमगीत पत्रके , बॅनरबाजी ,टिव्ही चॅनल , केबल चालक , न्यूज पेपर , मोबाईल याद्वारे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत या भुलभुलैया जाहिरातीमुळे नागरिकांना घरे घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या या तानाजी मालुसरे सिटीच्या बिल्डरांनी गोड बोलून सर्वसामान्य नागरिकांचा केसाने गळा कापला आहे.

सन २००८ साली गोपी रिसोर्ट प्रा.लि या कंपनीने कर्जत तालुक्यातील मौजे शिरसे आकुर्ले या ठिकाणी १०४ एकर जागा खरेदी केली. सदर जागेत गोरगरीब लोकांना स्वस्त घर देण्याचे आमिष दाखवून तानाजी मालुसरे सिटी या नावाने गृह प्रकल्प सुरु केला होता. कालांतराने गोपी रिसोर्ट प्रा.लि या कंपनीच्या भागीदारांमध्ये वाद झाल्याने सदर प्रकल्प शेलट्रेक्स प्रा.लि या कंपनीने विकत घेतला असून त्या जागेवर सदर प्रोजेक्ट प्रस्तावित आहे.

या प्रोजेक्ट मध्ये सन २००८ ते सन २०१९ या दरम्यान ४१५७ इसमांनी सुमारे १३५ करोड रुपयांची गुंतवणूक केली असून त्याकरिता विविध बँकद्वारे ५६ करोड रुपये कर्ज घेतले आहे व इतर रक्कम रोखीने घेतली आहे. अशा प्रकारे ४१५७ इसमांचे सुमारे १९१ करोड रुपये सन २०१९ पावेतो कंपनीस प्राप्त झालेले आहेत.

सन २०१७ ते २०१९ या दरम्यान शेलट्रेक्स प्रा.लि.या कंपनीने कंन्सट्रक्शन करण्याकरिता ECL फायनान्स, इडलवाईज हाऊस, विद्यापीठ रोड, कालिना , सांताक्रुज पूर्व मुंबई या कंपनीद्वारे सुमारे १८० करोडचे कर्ज घेतले आहे. त्याकरिता कंपनीची सुमारे एकर जमीन गहाण ठेवण्यात आली आहे. दोन्हीची बेरीज करत आता पर्यंत कंपनीत एकूण 371 करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.

एकूण १०४ एकर जागेपैकी काही भागात सुरवातीला सन २००८ ते सन २०१३ या दरम्यान कंपनीने काही बिल्डींग बांधल्या. परंतु त्याचे बांधकाम सुरक्षित नसल्याने त्या तोडण्यात आल्या.सध्या तळमजला अधिक दोन माळे अशा २२ बिल्डींग बांधून तयार झाल्या असून त्यात ८३९ फ्लॅट व शॉप आहेत. त्यापैकी ६७० हे शेलट्रेक्स प्रा.लि यां कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दारांचे असून उर्वरित १६९ फ्लॅट व शॉप हे वेगवेगळ्या लोकांनी खरेदी केलेले आहेत.

तयार असलेल्या ६७० फ्लॅट व शॉप यांचा संबधितांना ताबा घेण्याची ऑफर दिली असताना त्यापैकी फक्त ७० % इसमांनी आपआपल्या फ्लॅट व शॉपचा ताबा घेतलेला आहे. कंपनी मध्ये गुंतवणूक केलेल्या ४१५७ इसमांपैकी ७० % ते ८० % इसमांनी फ्लॅट व शॉप चे सेल रजिस्टर ऍग्रिमेंट केलेले आहेत. सुमारे २४७ इसमांनी ग्राहक निवारण मंच, अलिबाग यांच्याकडे केसेस दाखल केलेल्या आहेत.

त्याबाबत कंपनीने ग्राहक राज्य आयोग हुतात्मा चौक मुंबई यांच्याकडे अपील केलेले असून १४७ इसमासोबत सेटल मेंट झालेली आहे.गोपी रिसोर्ट प्रा.लि व शेलट्रेक्स प्रा.लि या कंपनीने विविध योजना राबिवल्या होत्या. त्यात प्रामुख्याने फ्लॅट व शॉप खरेदी करण्यास येणा-या ग्राहकांच्या फायनान्स पोझिशनवर व्यवहार करण्यात आलेले आहे. कंपनीत आतापर्यंत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपैकी १०८६ लोकांनी बँक द्वारे कर्ज काढून दिलेले आहे.

त्यातील सुमारे ८० % ते ९० % इसमांची बुकिंगची रक्कम अथवा जास्त रक्कम भरल्यानंतर बँक द्वारे झालेल्या कर्जाचे हप्ते फ्लॅट व शॉपचा ताबा देई पर्यंत कंपनी भरणार होती. बँकद्वारे कर्ज घेताना संबंधीत इसमाचे नाव कर्ज काढले असल्याने त्यांनी त्याचे चेक संबधित बँक यांना दिलेले होते. परंतु सन २०१७ नंतर कंपनीने कोणत्याही ग्राहकाची रक्कम बँक मध्ये न भरल्याने पर्यायाने गुंतवणूकदारांचे बँकेत दिलेले धनादेश बाउंस झाल्याने संबंधित बँक यांनी गुंतवणूकदारांविरुद्ध कोर्टात खटले दाखल केले आहेत.

तसेच काही बँक यांनी नोटीस पाठविलेल्या आहेत. गुंतवणूकदारांची सन २००८ पासून कंपनीत रक्कम जमा करून बँक द्वारे कर्ज मिळवून देवून देखील गोपी रिसोर्ट प्रा.लि व शेलट्रेक्स प्रा.लि या कंपनीने फ्लॅट व शॉप न देता फसवणूक केल्याबाबत सदर कंपनी व कंपनीच्या संचालकांविरुद्ध १ ) गोपी रिसोर्ट प्रा.लि अँड तानाजी मालुसरे सिटी मौजे शिरसे ता.कर्जत ,२ ) शेलट्रेक्स कर्जत प्रा.लि मौजे शिरसे ता.कर्जत ३ ) एबॉय मॉरिशस ४ ) श्री.गणेश राजेश कृष्णन ५ ) जोसिलव्हा ६ ) डी.के. मधुकर ७ ) श्री.उदयसिंग वाळूंज ८ ) श्री.हाफिज सौरभ कॉनट्रक्टर ९ ) श्री.संदीप सिंग १० ) श्री.सुरेश सिंग ११ ) श्री.अरुण आतलेकर १२ ) श्री.मुरारी दिनेश मुनीम १३ ) श्री.अनिल पांडुरंग कांबळे १४ ) श्री.जिनेंद्रक कन्हयालाल नाहर १५ ) श्री.सुनील विश्वनाथ १६ ) श्री.रवींद्र रमेश सिनकर १७ ) कीर्ती मलगौडा तीमन्नागौदर १८ )श्री.अनिल पांडुरंग शिंदे १९ ) श्री.अनिल सुभाष सावंत २० ) श्री.अमेय गणेश पाटील २१ ) श्री.मुकेश रुद्दल पटेल, यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी गु.र.जि २१९ / २०२१ भा.द.वि कलम ४२०, ४०६ ,४०९ , ४६५ , ४६७ , ४६८ , ४७१ , १२० ( बी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुधे यांचे मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधिक्षक रायगड सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.ए.शेख आर्थिक गुन्हे शाखा रायगड अलिबाग हे करीत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page