लोणावळा : दिशाभूल करून एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज एकत्र येत नाही अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिली आहे.
लोणावळा शहरातील उपजिल्हा रुग्णालय व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची सीमा भिंत यामधील अंतरावरून मागील काही दिवसांपासून मावळचे आमदार सुनील शेळके व रिपाईचे नेते सूर्यकांत वाघमारे यांच्यात तू तू मैं मैं सुरू आहे. नियमाप्रमाणे रुग्णालय व सीमाभिंत यामधील अंतर वीस फूट असणे अपेक्षित आहे. मात्र ते तीन फुटाने कमी भरत असल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याकरिता स्मारकाची सीमाभिंत तीन फूट आत घेण्यात यावी अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली होती. वास्तविक माननीय उच्च न्यायालयाने गठित केलेल्या तज्ञ समितीने देखील हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. त्याच्याच आधारे मी सदरची मागणी केली आहे असं सुनील शेळके म्हंटले होते.
मात्र त्याला सूर्यकांत वाघमारे यांनी विरोध दर्शविला होता. याकरिता त्यांनी आंबेडकरी जनतेला एकत्र करत आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात दोन वेळा मोर्चा देखील काढला होता. जन आक्रोश मोर्चावर प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके यांनी सूर्यकांत वाघमारे हे समाजाची दिशाभूल करत त्यांना चुकीची माहिती देत माझा स्मारकाला विरोध आहे असे सांगत असल्याचे म्हंटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सूर्यकांत वाघमारे म्हणाले दिशाभूल करून एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज एकत्र येत नाही. 3 फुट भिंत आत घेतल्यानंतर, त्याठिकाणी दीक्षाभूमी व पुढे जिण्याच्या पायऱ्यांना अडचण होणार आहे. रुग्णालयाचे काम करणारे शासकीय अधिकारी व स्मारकाचे काम करणारे शासकीय अधिकारी यांनी एकत्रित बसून त्यावर तोडगा काढावा. ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी दोन्ही ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या कामाचा ठेकेदार मी आहे असं सांगितलं जात आहे, या पुढील काळामध्ये किंवा या अगोदरच्या काळामध्ये या कामाची काढण्यात आलेली बिले ही आमदार सुनील शेळके मित्र मंडळ यांच्या खात्यात जमा करावी. म्हणजे काम कोण करत आहे, चेक कोणाच्या नावाने निघत आहेत हे देखील त्यांना समजेल. शहराच्या दृष्टीने दोन्ही कामे महत्त्वाची आहेत. यावर सर्व समावेशक तोडगा काढायचा असल्यास तो संवादातून निघू शकतो. आम्ही काल, आज व उद्या कायमच चर्चेसाठी तयार आहोत. यापूर्वी देखील चर्चेसाठी निरोप देण्यात आले होते मात्र चर्चा करण्यासाठी कोणीही आलेले नाही. याकरिता क्रिया प्रतिक्रिया न देता प्रत्यक्ष आमदार सुनील शेळके यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी, अथवा आम्हाला चर्चेसाठी बोलवावे. यापुढे या प्रकरणात आम्ही कोणती क्रिया प्रतिक्रिया देणार नाही, समोरच्यांनी देखील तोडगा काढायचा असल्यास प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी असे आवाहन सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.