Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळानगरपरिषद व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात लोणावळ्यात आमरण उपोषण…

नगरपरिषद व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात लोणावळ्यात आमरण उपोषण…

लोणावळा : आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता एका बंगले धारकाने भिंत बांधून बंद केल्याने आम्हाला भिंतीवरून उड्या मारून जावे लागत आहे. तो रस्ता आम्हाला खुला करून दया या मागणीसाठी लोणावळा नगरपरिषद व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.सदरचा रस्ता मागील शंभर वर्षांपासून रेल्वे पाईप लाईन रस्ता म्हणून ओळखला जातो व तो रेल्वेच्या जागेत आहे. असे असताना आपली कोणतीही परवानगी न घेता शेजारच्या सर्वे नं.53 मधील व्यक्तीने भिंत बांधत तो बंद केला असल्याचा आरोप भुशी सर्वे नं. 54/2 मधील रहिवाशी यांनी केला आहे.सदरचा रस्ता खुला करून द्या या मागणीसाठी 7 फेब्रुवारी पासून येथील रहिवाशी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर उन्हात आमरण उपोषणाला बसले आहेत.
मागील अनेक वर्ष हा विषय वारंवार पुढे येत असताना लोणावळा नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. यामुळे स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी त्यांना भिंतीवरून उड्या मारून जावे लागत आहे. लहान मुले, वयस्कर नागरिक, महिला यांनी घरी जायचे कसे व घरातून बाहेर पडत मुख्य रस्त्यावर यायचे कसे असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे. वारंवार पत्र व्यवहार करून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर हे नागरिक दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. एकतर न्याय द्या अन्यथा उपोषण करून जीव घ्या अशी भूमिका या नागरिकांनी घेतली आहे.
लोणावळा तलावाच्या समोर असलेल्या सहारा पुलाच्या पूर्वेकडील बाजूला सदरचा सर्वे नं. 54/2 व सर्वे नं. 53 आदी मालमत्ता आहे. यापैकी सर्वे नं. 54/2 मध्ये मंजूर ले आऊट मध्ये 30 ते 35 कुटूंब आहेत. त्यांना जाण्यासाठी पूर्वीच्या रेल्वे पाईप लाईन चा रस्ता आहे. त्याच ठिकाणी लोणावळा नगरपरिषदेचा डीपी रस्ता देखील आहे. हा रस्ता शेजारील सर्वे नं 53 मधील डॉ. हकीम यांनी बंद केला असल्याचा सदर रहिवाश्यांचा आरोप आहे.लोणावळा जागरूक नागरिकांनी आज उपोषणकर्ते यांची भेट घेत त्यांची बाजू मुख्याधिकारी यांना सांगितली तसेच उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page