
लोणावळा दि.29: निगडी ते लोणावळा PMPL बससेवेचा शुभारंभ आज लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
निगडी ते कामशेत दरम्यान सुरु असलेली PMPL ची बस सेवा लोणावळ्यापर्यंत करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासून नागरिक, विध्यार्थी व कामगार वर्गांची मागणी होती. आकुर्डी परिसरात कॉलेज व कामासाठी जाणारे कामगार व विध्यार्थी यांची गैरसोय लक्षात घेता ही बससेवा निगडी ते लोणावळा अशी सुरु व्हावी यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्याने आजपासून निगडी ते लोणावळा PMPL च्या नऊ बसेस धावणार असून लोणावळा ते निगडी फक्त 55 रुपये असा प्रत्येकी तिकीट दर राहणार आहे.
सध्या लोकल सेवा सुरळीत नसल्याने अनेक नागरिक व विध्यार्थी तसेच कामगार तरुणांना प्रवासासाठी खूप कसरत करावी लागत होती या सर्व बाबी लक्षात घेऊन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ही बस लोणावळा रेल्वे दवाखाना व शांती चौक येथे थांबणार असून याठिकाणी बस स्थानक असणार आहे अशी माहिती विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी दिली आहे. तसेच प्रवाश्यांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आलेल्या या सेवेचा जास्तीत जास्त प्रवाश्यांनी लाभ घेतल्यास आजपासून नऊ बस धावणार असून पुढे नऊच्या अठरा बसेस लोणावळा ते निगडी धावतील असे मत निगडी डेपोचे प्रमुख शांताराम वाघीरे यांनी मांडले आहे.
या शुभारंभास नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर,नगरसेवक श्रीधर पुजारी, गट नेते देविदास कडू, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, जितेंद्र कल्याणजी, लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडचे अध्यक्ष अनिल गायकवाड, नगरसेवक राजू बच्चे, नगरसेवक सुधीर शिर्के, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष तिखे, नगरसेविका मंदा सोनवणे, आरोही तळेगावकर, पुजा गायकवाड, गणेश साठे, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मनिष सिसोदिया, पोपटराव भेगडे, दिपाली गोकर्ण, निगडी डेपोचे प्रमुख शांताराम वाघीरे यांसमवेत अनेक नागरिक उपस्थित होते.