Sunday, July 14, 2024
Homeपुणेमावळपवनाबंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात आंदोलनास आज नऊ वर्ष पूर्ण.. प्रकल्प अद्यापही रद्द झालेला...

पवनाबंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात आंदोलनास आज नऊ वर्ष पूर्ण.. प्रकल्प अद्यापही रद्द झालेला नाही.

(पवना प्रतिनिधी : सचिन कालेकर )
मावळ : 9 ऑगस्ट 2011 हा दिवस मावळच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. याच दिवशी पवनाबंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात मावळातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. मावळातील अनेक गोरगरीब शेतकरी बांधवांनी ह्या आंदोलनात सहभाग घेतला होता. हे आंदोलन शांततेत पार पाडने हाच आंदोलकांचा मनसुबा होता. परंतु रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पसरविण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि हे आंदोलनकर्ते आक्रमक झाले त्यावेळी बऱ्याच वाहनांची तोडफोड व जाळपोळ झाली.

त्यावेळी झालेल्या गोळीबारात तीन गरीब शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला , बारा जण जखमी झाले आणि आंदोलनातील दोनशे शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ह्या आंदोलनात आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या शेतकऱ्यांना आज येळसे, काले, पवना नगर येथील स्मारका ठिकाणी सालाबादप्रमाणे श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यावेळी खासदार : श्रीरंग आप्पा बारणे, आमदार : सुनील अण्णा शेळके, शिव सेनेचे जिल्हा प्रमुख : गजानन चिंचवडे, उपजिल्हा प्रमुख : शरद हुलावळे, पुणे जि. महिला संघटक : शादान चौधरी, मावळ संघटक :अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, मावळ सल्लागार : भारत ठाकूर, लोणावळा शहर प्रमुख : बाळासाहेब फाटक, देहू शहर प्रमुख : सुनील हगवणे, तळेगाव श. प्रमुख : भेगडे, विभाग प्रमुख : किसन तरस, राम सावंत इत्यादीं समवेत मनिष पवार, तानाजी सूर्यवंशी, पोपट राक्षे, किशोर शिर्के, अनिल भालेराव, सचिन कालेकर, उमेश ठाकर, उमेश कुंभार, अक्षय इलवडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन अमित कुंभार ( शिवसेना उपतालुका प्रमुख ) यांनी केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद भूमिपुत्रांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले.

श्रद्धांजली वाहताना खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकऱ्यांच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याच्या ह्या प्रश्नाकडे राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाहण्याची वेळ आहे आणि त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन लक्ष घातले पाहिजे असे म्हणाले. तर आमदार सुनील अण्णा शेळके ह्यांनी आंदोलनात जखमी झालेल्यांना एक वर्षाच्या आत नोकरी मिळवून देऊ असे बोलत पवनाबंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करण्याकरीता सर्व राजकीय नेते आणि मावळातील सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन चर्चा करावी चर्चेतून जो शेतकऱ्यांचा निर्णय राहील त्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ अशी ग्वाही दिली.

सदर आंदोलनास मावळातील शिवसैनिकांचा कायम पाठिंबा असून उद्धव ठाकरे यांनी 2011 साली आंदोलकांच्या घरी भेट देऊन ” आमचे सरकार आले तर आम्ही हा प्रकल्प रद्द करू असे आश्वासन दिले होते “. किंबहुना भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मृतांच्या वारसांना नोकऱ्या मिळाल्या, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले, मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे स्मारक उभे केले परंतु हा प्रकल्प काही अद्यापही रद्द केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून आता हे सरकार पवनाबंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करणार का ? आंदोलनातील शेतकऱ्यांच्या ह्या मूळ प्रश्नाकडे लक्ष घालून, या घटनेतील जखमींना लवकरात लवकर न्याय मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page