खोपोली( दत्तात्रय शेडगे)
पाकिस्तान -ओखा (गुजरात )सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील जलपरी या मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला असून त्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील तरुण मच्छिमार बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती.यामध्ये मृत्यू पावलेल्या श्रीधर रमेश चामरे या मच्छीमार बांधवांच्या कुटुंबियाना काल रोजी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे सदस्य आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली त्याचा धनादेश भाजपा मच्छिमार सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अँड. चेतन रमेशदादा पाटील यांनी मृत मच्छीमार बांधवांच्या कुटुंबियांना सुपूर्त केला.
यावेळी अँड. चेतन पाटील यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात गुजरात सीमेजवळ जलपरी या भारतीय मासेमारी बोटीवर पाकिस्तानकडून भ्याड हल्ला करण्यात आला असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहे. या हल्ल्यामध्ये वडराई येथील आपल्या तरुण मच्छिमार बांधवाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या बांधवाच्या कुटुंबीयांना आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.आमदार रमेशदादा पाटील नेहमीच मच्छीमार बांधवांवर येणाऱ्या संकटाच्या काळात त्यांना निस्वार्थपणे मदत करीत असतात.
गेल्या अनेक वर्षापासून ते कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून मच्छिमार बांधवाच्या उन्नतीसाठी काम करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री यांना मृत मच्छीमार बांधवांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने तात्काळ मदत देण्यासाठी पत्रव्यवहार केला असून शासन लवकरात लवकर योग्य ती मदत करेल अशी आशा आहे.त्याचप्रमाणे हा हल्ला गुजरात राज्याच्या हद्दीमध्ये झाला असल्याने गुजरात राज्याकडूननही या कुटुंबाला मदत मिळण्याकरिता आम्ही विनंती करणार आहोत.
तसेच केंद्र सरकारकडे सुद्धा आम्ही मृत मच्छीमार बांधवांच्या लहान मुलांच्या व कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अँड .चेतन पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष . अशोक हंबीरे, भाजपा नेते विजय तामोरे, जिल्हा सचिव प्रमोद आरेकर, पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री .भुषण पाटील ,भाजपा जिल्हा सरचिटणीस सुजित पाटील, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर पाटील, सचिन पागधरे, .धनंजय मेहेर तन्मय साखरे ,.पंकज मेहेर, नंदिनी ताई चामरे इ. मान्यवर व भाजपा मच्छीमार सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.