खोपोली (प्रतिनिधी):जुण्या मुंबई – पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाट येथील सायमाळ याठिकाणी आज रविवार दि.6 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि प्रवासी बस यांचा भीषण अपघात झाला . या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जागीच ठार झाले तर रिक्षा चालकासह अन्य दोन जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे .
मिळालेल्या माहितीनुसार कुमार गौरव गौतम ( वय 26 , मुळ राहणार रीवा , मध्यप्रदेश ) आणि शत्रुंजय त्रिपाठी ( वय 27 ) असे मृत झालेल्या व्यक्तींची नाव आहेत. रविवारी सकाळी 10.50 च्या दरम्यान रेल्वे मध्ये लोको पायलट म्हणून काम करणारे रेल्वे कर्मचारी कुमार गौरव गौतम , शत्रूंजय त्रिपाठी तसेच राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे इतर दोन असे एकूण चार जण लोणावळा येथील वेट अँड जॉय या वॉटर पार्क मध्ये आपली सुट्टी एन्जॉय करून खोपोली रेल्वे स्टेशनकडे येण्यासाठी निघाले होते.
ते रिक्षा क्रमांक ( MH 14 HM 5296 ) मधून प्रवास करत असताना रिक्षा सायमाळ जवळच्या वळणावरील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सूटल्याने उलटी होऊन खोपोली कडून पुण्याकडे निघालेल्या प्रवासी बस क्रमांक ( MH 04G 9925 ) ड्रायव्हर साईडला धडकली . सदर अपघात एवढ्या गंभीर स्वरूपाचा होता की यातील कुमार गौरव गौतम याचा जागीच मृत्यू झाला . शत्रूंजय त्रिपाठी हा गंभीर रित्या तर राघवेंद्र राठोड , सौरभ पाठक रिक्षाचालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले . यातील शत्रुंजय त्रिपाठी याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला .
जखमी राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत . तर मृत कुमार गौरव गौतम आणि शत्रूंजय त्रिपाठी हे देखील सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत होते . रिक्षा चालक हा लोणावळा येथील रहिवासी असून तो खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचार घेत आहे.
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला असून सदर घटना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर व त्यांचे कर्मचारी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू केले . या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे करत आहेत.