Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभारतीय जनता पक्षाने माझे ध्येय व स्वप्न पूर्ण केले-गोव्याचे विधानसभा सभापती रमेशजी...

भारतीय जनता पक्षाने माझे ध्येय व स्वप्न पूर्ण केले-गोव्याचे विधानसभा सभापती रमेशजी तवडकर !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) लहानपणी विद्यार्थी दशकात आठ मैल चालत प्रवास करून शिक्षण घेतले , मात्र भविष्यात शिक्षक होऊनच अनेकांना शिक्षणाचे धडे देईन , अशी महत्त्वाकांक्षा मनात बाळगून स्वप्नपूर्ती व ध्येय गाठण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मला साथ दिली व आज ” विद्यार्थी ते सभापती ” असा राजकीय प्रवास साध्य केला , असे प्रांजळ मत गोवा प्रांताचे विधानसभा अध्यक्ष तथा सभापती व चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले मा.रमेशजी तवडकर यांनी कर्जत मध्ये वेणगाव येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस रमेश मुंडे यांच्या निवासस्थानी स्नेह भेटीस आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केले.

गोव्याचे विधान सभा सभापती मा.रमेशजी तवडकर यांच्या स्वागतासाठी जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे , जिल्हा चिटणीस रमेश मुंडे ,कर्जत ता.अध्यक्ष मंगेश म्हसकर , कर्जत न.प. चे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , नगरसेवक बळवंत घुमरे ,नगरसेविका स्वामींनी मांजरे , माजी नगरसेविका बिनीता घुमरे ,नितीन कांदळगावकर , कल्पना दास्ताने , शहर अध्यक्षा शर्वरी कांबळे , त्याचप्रमाणे भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग उपस्थित होते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानार्जन करण्यासाठी व शिक्षणानेच सर्वांचा विकास होतो , म्हणून शिक्षक झालो , मात्र संपूर्ण गोव्यात शिक्षणाचे रोपटे लावायचे असेल तर राजकीय क्षेत्रात जाणे योग्य ठरेल म्हणून भारतीय जनता पक्षात सामील होऊन आमदार , मंत्री , व आता विधानसभेचे अध्यक्ष पद हे सर्व माझे ध्येय व स्वप्न भारतीय जनता पक्षाने पूर्ण केले , असे संघर्ष पर्व दिलखुलास गप्पात आपला जीवनपट गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी कर्जतकर भाजपा कार्यकर्त्यांसमोर मांडला.
आता गोवा मजा करण्याचे स्थळ न ठेवता ज्ञान मिळण्याचे ठिकाण करून संपूर्ण राज्यभर शाळेचे जाळे पसरविले असल्याचे यावर त्यांनी प्रकाश टाकला . तर मागेल त्याला घर असा संकल्प देखील गोव्यात केल्याचे सांगितले , त्यांनी अनेक विषयांवर पैलू पाडत एक ही पैसा न देता भ्रष्टाचार विरहित काम करत गोवा ते दिल्ली प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून नोंद असल्याचे सांगितले.

तर कार्यकर्ते – पदाधिकारी – आमदार – मंत्री ते विधानसभेचे अध्यक्ष होऊनही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची सन २०१४ पासून आपुलकीने विचारपूस ते कर्जत मध्ये स्नेह भेट हा ऊतुंग स्वभाव अध्यक्ष रमेशजी तवडकर यांचा असल्याचे सांगत त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे ,आणि हे फक्त भाजप व संघ परिवारात पाहण्यास मिळते , असे भावनिक मत रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंडे यांनी व्यक्त केले . यावेळी दिपक बेहरे यांनी देखील आपले विचार मांडले , याप्रसंगी रमेश मुंडे यांचे सर्व कुटुंबिया कडून , तसेच सर्व कर्जत ता. पदाधिकारी व महिला वर्गाने त्यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page